सुमित दंडुके / औरंगाबाद : लिफ्ट मागत असताना चुकून धक्का लागल्याच्या कारणावरून दोन युवकांनी एका ज्येष्ठाला चाकूने भोसकल्याची घटना दि.२१ रोजी रात्री साडेदहा वाजेला घडली होती. या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना दि.२३ रोजी रात्री गुन्हे शाखेने अटक केली आहे. शेख बशीर शेख वजीर (वय.२१, रा. मुजीब कॉलनी, कटकट गेट) व शेख इम्रान शेख वजीर (वय.२०, रा. दानीश पार्क, नारेगाव) अशी आरोपींची नावे असून, त्यांना दि.२८ गुरुवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. कांबळे यांनी दिले.
भावसिंगपुरा भागातील नारायण कचरू गवई (वय.५३, रा.भीमनगर) हे २१ जानेवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास मिल कॉर्नरहून घरी जाण्यासाठी वाहन शोधत होते. त्यावेळी तेथून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला त्यांनी लिफ्ट मागण्यासाठी हात दाखवला, मात्र, तेवढ्यातच तेथून दुचाकीवर (क्र.एमएच २० एफक्यू ३०७) जात असलेल्या शेख बशीर व शेख इम्रानला गवई यांच्या हाताचा धक्का लागला. या कारणावरुन दोघांनी गवई यांच्याशी वाद घातला व त्यांच्या पोटात चाकूने वार केले. या घटनेनंतर दोन्ही हल्लेखोरांनी धूम ठोकली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेने सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली.