सुमित दंडुके / औरंगाबाद : पिशोर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपीने पिशोर पोलीस ठाण्याच्या शौचालयात शुक्रवारी शौचालय सफाईचे रसायन प्राशन केले होते. अत्यवस्थ अवस्थेतील या तरुणाचा उपचारादरम्यान शनिवारी औरंगाबाद येथे मृत्यू झाला. भगवान हरिदास महालकर (वय ३५, रा.खांडी पिंपळगाव ता.खुलताबाद ) असे या तरुणाचे नाव आहे.
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेलेल्या या तरुणाला अल्पवयीन मुलीसोबत देवगड (ता.नेवासा जि.अहमदनगर) येथून नेवासा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या दोघांना नेवासा पोलिसांच्या ताब्यातून पिशोर पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी अल्पवयीन पीडितेचा जबाब घेतला होता. संशयित तरुणाने पीडितेला फूस लावून पळवून नेऊन अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. आरोपीवर अपहरण व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तरुणाला गुरुवारी (दि.२१) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सोमवार (दि.२५) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
पिशोर पोलिसांच्या ताब्यात असताना शुक्रवारी शौचास जाण्यासाठी कर्मचारी शौचालयात घेऊन गेले होते. तेव्हा त्याने शौचालयात जाऊन शौचालय साफ करण्याचे रसायन पिले. विषारी रसायन प्राशन केल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्याला तात्काळ पिशोर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता प्राथमिक उपचारानंतर त्याला औरंगाबादला घाटी रुग्णालयात दाखल केले होते. शनिवारी (दि.२३) रोजी उपचारादरम्यान दुपारी साडेतीन वाजता या तरुणाचा मृत्यू झाला. यासंदर्भात पिशोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.