विजय कुलकर्णी/परभणी: जायकवाडी परिसर खून प्रकरणातील आरोपींना नवामोंढा पोलिसांनी दि.२ रोजी न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
जायकवाडी परिसरात रविवार रात्री क्षुल्लक कारणातून जयवंत पवार (वय ५२) यांचा रवी उडाणशिव याने धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून केला होता. ही घटना दि.१ रोजी सकाळी ९ च्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी नवामोंढा पोलिसांना याची माहिती दिली. नवामोंढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर तट, फौजदार रमेश गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे हे कर्मचा-यांसह तात्काळ दाखल झाले. पाठोपाठ सहाय्यक पोलिस अधीक्षक अविनाश कुमार,स्थागुशाचे सहाय्यक निरीक्षक व्यंकटेश आलेवार, फौजदार साईनाथ पुयड हेही घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथकासह ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वान जायकवाडी परिसरात घुटमळले. घटनास्थळी दारूच्या फुटलेल्या बाटल्या आढळल्या. घटनेचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या शोधार्थ पथके रवाना केले. या दरम्यान जयवंत पवार यांना एक जण जेवणाचा डब्बा आणून देत होता व त्यानेच खून केला असावा, असा संशय बळावल्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध सुरू केला.
त्यावेळी धर्मापुरी येथे काम करणा-या रवी उडानशीव यास स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार पुयड, कर्मचारी बालासाहेब तुपसुंदरे, दिलावर पठाण, किशोर चव्हाण, हरिचंद्र खुपसे, संजय घुगे, सानप, निळे यांच्या पथकाने सोमवारी रात्री धर्मापुरीतून ताब्यात घेऊन नवामोंढा पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या चौकशीअंती त्याने खूनाची कबुली दिली. जयवंत पवार याने आपणास यापुर्वी शिविगाळ केली होती, त्याच बरोबर रविवारी दारू पिताना भांडण झाले. त्या वादावादीतून रागाच्या भरात खून केला असल्याची माहिती उडाणशिव याने पोलिसांना दिली.
दरम्यान, मंगळवारी फौजदार रमेश गायकवाड यांनी रवी उडाणशीव यास मंगळवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोनि रामेश्वर तट यांनी दिली.