विजय कुलकर्णी/ परभणी : जायकवाडी वसाहतीमधील खून प्रकरणात पोलिसांनी काल रात्री उशीरा एकास ताब्यात घेतले आहे. जायकवाडी परिसरात रविवारी रात्री जयवंत पवार यांचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून करण्यात आला होता. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास ही बाब उघडकीस आली. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर तट, सहाय्यक पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे, फौजदार रमेश गायकवाड, शैलेश जाधव, अजय पाटील यांच्यासह स्थागुशाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, फौजदार साईनाथ पुयड हे कर्मचाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी ठसे तज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, सहाय्यक पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नवामोंढा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरु केला. मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. साईबाबा नगरातील रविंद्र उडाणशिव यास अवघ्या काही तासात जेरबंद केले. शिव्या दिल्याचा राग मनात धरून रवि उडाणशिव याने जयवंत पवार याचा खून केल्याची माहिती पोलिस सूत्रानी दिली. हा खुन किरकोळ कारणावरुन झाल्याचे समोर आले आहे.