सुमित दंडुके / औरंगाबाद : बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील एक वृद्ध महिला दारुड्या नव-याच्या त्रासाला कंटाळून रागाच्या भारात घर सोडून औरंगाबादला आली, वय जास्त असल्यामुळे चालताही येत नव्हते, मग कसतरी घसरत घसरत रस्त्याने जात असताना काही लोक मुद्दाम या वृद्धेला त्रास देत होते. आणि आजुबाजूची माणसं फक्त बघत होते.
एका सुजाण व्यक्तीने याची माहिती ज्येष्ठ नागरीक सहायता कक्षाला दिली. महिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक स्नेहा करेवाड सहकाऱ्यांसह त्याठिकाणी पोहोचल्या व वृद्धेला धीर दिला, विश्वास दिला. आणि भावसिंगपुरा येथील नवजीवन धारा संस्थेमध्ये त्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली.
नंतर त्यांची चौकशी केली तेव्हा त्या वृद्धेने तीचे नाव सावित्रीबाई गायकवाड असून त्या बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे त्यांच्या सर्वात लहान मुलाकडे राहते असे सांगितले. एकूण सात अपत्ये आहेत पण लहान मुलगाच मला आणि माझ्या पतीला सांभाळतो, पती दारु पिऊन त्रास देत असल्यामुळे मी रागाच्या भारात घर सोडून आले. पण आता मला माझ्या घरी जायचय... अस या वृद्धेने पोलिसांना सांगितले.
स्नेहा करेवाड यांनी तात्काळ देऊळगाव राजा येथे त्यांच्या मुलाशी संपर्क साधत त्यांना औरंगाबादेतून घेऊन जाण्यास सांगितले. चालता येत नसल्यामुळे वृद्धेला बसमधून नेणे शक्य नव्हते आणि आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने मी गाडी करून आईला घेऊन जाऊ शकत नाही असे मुलाने स्नेहा करेवाड यांना सांगितले. त्यांनी लगेच वरिष्ठांशी चर्चा करून प्रायव्हेट गाडीची व्यवस्था करून त्या वृद्ध महिलेला मुलासोबत घरी पाठवण्याची व्यवस्था केली. जाताना या वृद्ध महिलेच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता, त्यांनी सर्व पोलीस दलाचे आणि स्नेहा करेवाड यांचे आभार मानत आशीर्वाद दिले.
शहरात कुठेही ज्येष्ठ नागरीकांना मदतीची गरज असेल तर त्यांनी तात्काळ ज्येष्ठ नागरिक सहायता कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक स्नेहा करेवाड यांनी केले आहे.
आणि त्या वृद्धेच्या चेह-यावर फुलले हसू...
दामिनी पथकाच्या सतर्कतेमुळे ज्येष्ठ महिलेला पुन्हा मिळाली घराची ऊब...

Loading...