मराठवाड्याच्या आणि राज्याच्या राजकीय क्षितिजावर स्व.विलासराव देशमुखांचा उदय होण्यापूर्वी महाराष्ट्र आणि मुख्यत्वे मराठवाडा कांग्रेसमध्ये डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे एक प्रभावी होते. प्रदीर्घ काळ मंत्रीपद भुषवल्यानंतर अचानक आलेलं मुख्यमंत्रीपद आणि त्या पाठोपाठ आलेलं प्रदेशाध्यक्षपद हे त्यांना कुठलंही सेटिंग किंवा का्ॅग्रेसचं पारंपरिक "दरबारी" राजकारण न करता मिळालं होतं. अशी महत्वाची पदं देखील लॉबिंग न करता मिळवता येतात त्याचं डॉ. शिवाजीराव हे एकमेव उदाहरण असावेत..
९ फेब्रुवारी १९३१ रोजी जन्मलेले शिवाजीराव पाटील एक राजकारणातील उच्चविद्याविभूषीत व्यक्तिमत्व होते. त्यांनी राज्यशास्त्रात MA राज्यशास्त्रासोबत नागपुर विद्यापीठातून LLB पदवीदेखील संपादन केली, आणि त्यानंतर नागपुर विद्यापीठातूनच "मराठवाड्यातील राजकीय जागृती ,चळवळी आणि बदल" या विषयावर पी.एच.डी. केली. एखाद्या राजकीय पुढारी असं काही संशोधनात्मक अभ्यासू काम करतो जे बहुदा तत्कालीन राजकारणातील क्वचितच उदाहरण राहिलं असेल.. शिवाजीराव हे प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळविणारे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी शोधप्रबंधात मराठवाड्याच्या विकासाचा वेध घेतला. एम. ए. आणि एलएल. बी. या दोन्ही पदव्युत्तर पदव्या त्यांनी एकदम मिळवल्या. त्यावेळी केवळ नागपूर विद्यापीठात अशा पदव्या घेण्याची मुभा होती..
डॉ. निलंगेकर हे राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्याआधी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते. राष्ट्रीय सेवा दलाच्या माध्यमातून १९४५ ते १९४८ दरम्यान ते देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. त्याबरोबरच १९४७-१९४८ दरम्यान हैद्राबाद मुक्तिसंग्रामात त्यांचा सक्रीय सहभाग होता. आर्य समाज, सेवादल, महाराष्ट्र परिषद व इतर संघटनांच्या माध्यमातून डॉ शिवाजीराव स्वातंत्र्य लढ्यात आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या नावावर भरीव कार्याची नोंद आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा यशस्वीरित्या संपल्यानंतर शिवाजीरावांनी राजकारणात प्रवेश केला. तब्बल ४२ वर्ष त्यांनी राज्याच्या विधानसभेत प्रतिनिधित्व केलं. राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून डॉ निलंगेकर तब्बल सहा दशके कार्यरत होते. पहिल्यापासुन विकासाच्या बाबतीत मागास आणि दुर्लक्षित असलेल्या मराठवाड्यातील लातुर जिल्ह्यात निलंगेकरांनी १९६८ साली निलंग्यात "महाराष्ट्र शिक्षण समिती" नावाची शिक्षण संस्था स्थापन केली. शैक्षणिक संस्थेची स्थापना करुन शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या जिल्ह्यात ज्ञानाची गंगा आणुन शिवाजीराव ज्ञान भगीरथ बनले. १९६८ साली लावलेलं ते रोपटं आज वटवृक्षाच्या स्वरूपात बदललं आहे. आज त्या शिक्षण संस्थेच्या तब्बल ३१ शाखा कार्यरत आहेत. त्यात ४ वरिष्ठ महाविद्यालय, १२ महाविद्यालय आणि १५ प्राथमिक विद्यालयाचा समावेश आहे.
डॉ शिवाजीरावांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या अल्प कालावधीत काही महत्वपूर्ण कामं केली. ज्यामध्ये लातूर आणि जालना जिल्ह्याच्या निर्मितीचा मुद्दा नोंदणीय आहे. लातुर जिल्हा होणार ही घोषणा १९८२ साली करण्यात आली होती पण त्या प्रक्रियेला गती मिळाली ती निलंगेकरांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात. लातूर व जालना जिल्हा निर्मीती बरोबरच औरंगाबाद महानगरपालिकेची स्थापना आणि औरंगाबाद खंडपीठाच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.
औरंगाबाद खंडपीठाच्या स्थापनेसंदर्भातल्या काही गोष्टी आणि आडनावातलं गायकवाड वगळण्याची विधानसभेतली कथा त्यांचे नातू अरविंद पाटील यांनी ऐकवल्या होत्या. औरंगाबाद खंडपीठाची बांधणी किंवा एकंदरीत संपुर्ण स्ट्रक्चर हे दिल्ली कोर्टाच्या स्ट्रक्चरशी तंतोतंत मिळतंजुळतं आहे हे ही त्यांनी सांगितलं होतं.
शिवाजीराव पहिल्यांदा आमदार झाले ते १९६२ साली. त्यानंतर २३ वर्षे ते सलग पाच विधानसभा जिंकले. १९८५ विधानसभेचा अपवाद वगळता १९८७-१९९०-१९९९-२००९ अशा चार विधानसभा त्यांनी जिंकल्या. दरम्यानच्या काळात अनेक राजकीय वादळं-स्थित्यंतरं आली, पक्षांतर्गत कुरघोड्या झाल्या पण शिवाजीरावांनी त्यांची पक्षनिष्ठा कधीच सोडली नाही. पक्षाची पडझड होत असतानाही त्यांची निष्ठा बदलली नाही.विधानसभेच्या नव्या इमारतीच्या उभारणीचं बरंचसं काम डॉ. निलंगेकरांच्याच कार्यकाळात झालं.राज्याची सिंचन क्षमता वाढवण्यासाठी त्यांनी केलेले काम नक्कीच दिशादर्शक आहे. जलसिंचनाचे अनेक महत्वाचे प्रकल्प उदाहरणार्थ तेरणा (लोअर), उजनी, सिंधफणा, कुकडी, कृष्णा, मांजरा, डिग्वे, अप्पर वर्धा व असे बरेच मोठे तर अनेक मध्यम व लघू प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात मार्गी लागले."जिसकी लाठी उसकी भैंस" हा नियम राजकारणाला जरा जास्त प्रमाणात लागू होतो. ज्या भागातला लोकप्रतिनिधी कारभारी होतो तो आपल्या भागासाठी अधिक चांगले निर्णय घेतो हे सत्य आहे.
शिवाजीरावांच्या काळात मागास मराठवाड्यासाठी ४२कलमी, कोकण विभागासाठी ४०कलमी तर विदर्भासाठी ३३ कलमी कार्यक्रम आखला गेला होता.कायम दुष्काळाच्या दुष्टचक्रात आणि बेरोजगारीच्या विळख्यात असलेल्या मराठवाड्याला त्यांनी बाहेर काढण्यासाठी ४२कलमी कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केला.निलंगेकरांचा कार्यकाळ बघितला तर अशी अनेक विधायक कामं आपल्याला ठळकपणे दिसून येतात.१९८५ साली ते अनपेक्षितपणे राज्याचे मुख्यमंत्री झाले पण तत्पूर्वी एका मोठ्या राजकीय वादाची बीजं रोवली गेली होती.
ज्येष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी सांगतात की - १९८५ च्या निलंगा विधानसभेचं तिकीट पक्षाने डॉ. शिवाजीरावांना नाकारुन त्यांचे चिरंजीव दिलीपराव पाटील निलंगेकर यांना दिलं, निवडणुकीत दिलीपराव न भूतो न भविष्यती अशा भरघोस मताधिक्याने विजयी झाले. त्याच वर्षी अचानक डॉ. शिवाजीराव पाटील मुख्यमंत्री झाले, पर्यायाने पुत्र दिलीपरावांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला व त्यांच्यासाठी तिथं पोटनिवडणुकही झाली पण शिवाजीराव पराभूत झाले आणि इथूनच निलंगेकर घराण्यातले अंतर्गत वाद सुरु झाले, जे नंतर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात स्पष्टपणे दिसून आले."
राज्यातल्या निलंगेकर नामक एक मोठ्या राजकीय कुटुंबातील महाभारताला सुरुवात झाली. दिलीपरावांच्या निधनानंतर या वादाचा पुढील अंक पक्षांतरात झालं. दिलीपरावांच्या पत्नी रुपाताई आणि चिरंजीव संभाजी व अरविंद भाजपाच्या गोटात डेरेदाखल झाले. २००४ ली रुपाताई पाटील निलंगेकर भाजपातर्फे लातूर लोकसभेच्या उमेदवार म्हणून घोषित झाल्या. राज्यातील कांग्रेसचे दिग्गज नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचा रुपाताईंनी धक्कादायक पराभव केला हे कमी की काय म्हणून २००४ विधानसभेत स्व. दिलीपराव व रुपाताईंचे ज्येष्ठ पुत्र संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्यांचे आजोबा माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना पराभूत केलं. तेव्हाच निलंगेकर कुटुंबाचा योग्य व सक्षम राजकीय वारसदार कोण हे ठळकपणे अधोरेखित झालं होतं. राजकीय अपरिहार्यता की आणखी काही पण शेवटी नातवाला आजोबांचा पराभव करावा लागला.वरवर जरी संभाजी पाटील विजयी झाले तरी पराभव निलंगेकरांचाच झाला होता.नातवाने केलेल्या पराभवाची परतफेड आजोबांनी म्हणजेच डॉ शिवाजीरावांनी त्याच नातवाला २००९ च्या विधानसभेत पराभूत केल.
काही वर्षांनंतर पक्षीय राजकारणावर कौटुंबिक वादावर नातेसंबंधांनी अखेर मात केली, अखेर आजोबा-नातवाचं मिलन झालंच, ते मनोमिलन अनेक जाहीर कार्यक्रमातून दिसू लागलं.आपल्या पक्षीय भूमिका बजावत हे नात पुन्हा एकदा पुनरुज्जीवित होताना पाहून निलंग्याची जनता आनंदी झाली होती.
सरळमार्गी राजकारण करणा-या शिवाजीरावांना राजकीय पटावरचे एकाच वेळी खेळावे आणि खेळवावे लागणारे डावपेच फारसे जमले नाहीत. तशी त्यांची वृत्तीही नव्हतीच. आपण बरं आणि आपलं काम बरं, अशीच मंत्री आणि मुख्यमंत्रीपदी असताना त्यांची कामाची शैली होती. त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्रीपद भूषवूनही महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत:चा एखादा पक्षांतर्गत किमान प्रबळ गट त्यांना निर्माण करता आला नाही. शिवाजीराव निलंगेकर पाटलांची कथा आहे.
पदाचा कोणताही रुबाब न दाखवता त्यांचं सर्वांशी ऋजू वागणं ही त्यांची खरी मालमत्ता होती.आज डॉ.शिवाजीरावांचं नाव आणि निलंगेकर घराण्याचा राजकीय वारसा व तो आलेख त्यांचे दोन्ही नातू राज्यात उंचावत आहेत व याचा नक्कीच त्यांनाही मनापासुन आनंद वाटत असणार हे निर्विवाद आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री, कांग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राजकारणाच्या विलासी जगात आपलं साधेपण जपणारा एक निर्मळ मनाचा माणूस, मराठवाड्याचे भुमिपुत्र स्व. डॉ शिवाजीराव गायकवाड पाटील निलंगेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!!
- ओम देशमुख