विजय कुलकर्णी/ परभणी : महानगरपालिका हद्दीतील नवीन पोलिस ठाण्यास गृह खात्याने तातडीने मंजूरी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. बाबाजानी दुर्राणी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना गुरुवारी सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
परभणी शहरातील लोकसंख्या वाढली आहे. चौफेर वसाहती पसरल्या आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राखण्याकरीता एमआयडीसी परिसरात नवीन पोलिस ठाणे निर्माण करणे गरजेचे आहे. आपण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती. विधानपरिषदेत तारांकित प्रश्नही उपस्थित केला होता. त्यावेळी त्यांनी याबाबत पोलिस महासंचालकांमार्फत पोलिस अधिक्षकांकडून प्रस्ताव मागवून नविन ठाणे निर्माण करु, असे आ-वासन दिले होते. परंतु, प्रत्यक्षात कोणतीही कृती केली नाही. हा प्रश्नही अद्यापही प्रलंबित आहे, असे दुर्राणी यांनी या निवेदनात नमूद केले. परभणी शहरातील नवा मोंढा, ग्रामीण व ताडकळस या तीनही पोलिस ठाण्याचे विभाजन करुन एमआयडीसी परिसरात नविन पोलिस ठाणे निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यात काही सुधारणा व त्रुटी असल्याने त्यात दुुरुस्ती करुन पोलिस महासंचालकांकडे तो प्रस्ताव जिल्हा पोलिस अधिक्षकांनी पाठविलाही आहे. तो सुधारीत प्रस्तावही शासनाकडे प्रलंबित आहे, असेही दुर्राणी यांनी या निवेदनातून निदर्शनास आणून दिले आहे.