सिद्धेश्वर गिरी / सोनपेठ : तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या कान्हेगाव या ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली. अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत कान्हेगाव,डोबाडी तांडा,फरकाडी तांडा,गारगोटी तांडा, नवीन अबाधित वस्ती यांचा समावेश असल्याने ही ग्रामपंचायत मोठी ग्रामपंचायत असल्याचे कळते. युवासेनेचे तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे यांच्या पँनलला ११ पैकी ९ मोठ्या मताच्या फरकाने विजय मिळवण्यात यश आले होते.यात तालुका प्रशासनाच्या वतीने नुकतीच निवडीची एक बैठक घेण्यात आली होती. यात प्रतिस्पर्धी पँनलच्या दोन्ही उमेदवारांनी अनुपस्थिती लावत निवडीचा मार्ग मोकळा केला होता. सरपंचपदासाठी बेबीसरोज रामेश्वर मोकाशे तर उपसरपंचपदासाठी आशा माणिकराव कोरडे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने या निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. यासाठी प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवत ही निवड प्रक्रिया पूर्ण केली. या निवड प्रक्रियेत रामेश्वर भास्करराव मोकाशे, सरोजा शेषेराव मोकाशे, नामदेव बाबुराव दुगाने, मंगेश विठ्ठलराव पाटूळे, रुक्मिणबाई सुदामराव राठोड, गणेश शोभनराव मोकाशे, सत्यभामा दत्तराव सातपुते यांनी भाग घेतला होता.
विकास हेच ध्येय ठेऊन कार्यरत राहणार:-रामेश्वर मोकाशे
ग्रामस्थांनी मोठ्या अपेक्षेने आमच्या पॅनलला भरभरून प्रतिसाद देत आमच्यावर विश्वास दाखवला आहे. या विश्वासाचे ओझे विकास करुनच फेडणार आहे. कान्हेगाव,डोबाडी तांडा,फरकाडी तांडा,गारगोटी तांडा, नवीन अबाधित वस्ती या वसाहतीत राहणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थांची जबाबदारी आमची आहे. एक कुटुंबप्रमुख म्हणून कार्यरत राहणार असून निवडणुका येतील आणि जातील विरोधक हा निवडणुकीपुरता असल्याने त्यांनाही विश्वासात घेऊन कार्यरत राहणार असल्याचा मनोदय युवासेनेचे तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे यांनी व्यक्त केला.