ऋषिकेश शेवतेकर/मुंबई : कोरोना चा संसर्ग अजूनही थांबलेला नसून लस जरी उपलब्ध झाली असेल, तरी कोरोना विषाणू विरोधात मास्क हेच मुख्य शस्त्र असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी सांगितले.
राज्यात कोरोनाचे दिवसेंदिवस रुग्णाचे प्रमाण वाढत असल्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा कडक नियम लागू करण्यात आले. जनतेशी संवाद साधताना कोरोना चा प्रभाव टाळण्यासाठी कडक नियम लागू करण्याकडे पाऊले उचलली असून मंगळवारपासून राज्यातील मोठ्या राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी असणार आहे. तशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित करताना पुढील मुद्दे मांडले : pic.twitter.com/4yKI4i0Kts
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 21, 2021
पुन्हा एकदा कोरोनासोबत युद्ध करण्यासाठी मास्क हीच आपली ढाल असून त्याचा वापर करण्याचे आदेश यावेळी करण्यात आले. रुग्णाचे वाढते प्रमाण बघता कोविड योद्ध्यांना लवकरात लवकर लस टोचून घेण्यास सांगितले. राज्यात आत्तापर्यंत ९ लाख लोकांनी लस टोचून घेतली आहे.
कोरोनाचा कहर अजूनही संपलेला नाही. केवळ लस उपलब्ध झालेली आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. परिस्थितीनुसार लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिला आहे. दुसरी लाट आली की नाही, याबाबत अजूनही निदान झालेले नाही. आपण अनलॉक केले. सगळे हळूहळू सुरु केले. मात्र, गर्दी टाळण्याची गरज अजूनही असल्याचे सांगण्यात आले आहे.
मी जबाबदार ही नवीन मोहीम सुरु झाली असून, मास्क घाला, हात धुवा आणि सामाजिक अंतर पाळा या तीन गोष्टी कराच, असे त्यांनी यावेळी सांगितले. मास्क घालणे अनिवार्य आहे. शिस्त पाळणे हे आवश्यक आहे. संसर्गाची साखळी तोडायची असेल तर संपर्क टाळा. नियम मोडणाऱ्यांवार कडक कारवाई होणार, असे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. तुम्हाला लॉकडाऊन हवे की नको, हे तुम्हीच ठरवा, असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.