विजय कुलकर्णी/ परभणी : ‘माझा गाव सुंदर गाव’ उपक्रमांतर्गत गावातील रस्ते, नाल्या, शाळा, अंगणवाडी, गाव परिसर यांची स्वच्छता कशी राखावी आणि शौचालयाचा नियमित वापर करण्या बाबत परभणीचे गट विकास अधिकारी अनुप पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
परभणी तालुक्यातील बोरवंड बुद्रुक या ग्रामपंचायतीमध्ये आज माझा गाव-सुंदर गाव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकसहभागातून गावातील रस्त्यांची स्वच्छता, नाल्यांची स्वच्छता वृक्षारोपण, प्लास्टिक गोळा करणे मोहिम आदी उपक्रम राबवून गावातील पशु पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करण्यात आले आहेत. यावेळी गावातील सरपंच छायाताई कांबळे, उपसरपंच रुख्मिनबाई खवले, विस्तार अधिकारी जी एम गोरे, ग्रामसेवक संतोष जाधव, पोलीस पाटील खवले, आशाताई, अंगणवाडीताई यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्हाभर माझा गाव सुंदर गाव उपक्रम गावागावात जोरदार सुरू आहेत परभणी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला सदर उपक्रम यशस्वीपणे राबविण्याबाबत सुचित करण्यात आले आहे.