नांदेडः के आर एम महिला महाविद्यालयातील कार्यरत ग्रंथपाल डॉ.सौ.मेधा रणजीत धर्मापुरीकर यांना यावर्षीचा डॉक्टर सुरेश सातारकर, माजी ग्रंथपाल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जीवन विकास ग्रंथालय, औरंगाबाद तर्फे ठेवण्यात आलेला उत्कृष्ट महाविद्यालयीन ग्रंथपाल हा मराठवाडा पातळीवरचा पुरस्कार घोषित झाला आहे. गेल्या ३० वर्षापासून त्या नांदेड येथील महिला महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली या संस्थेतर्फे महाविद्यालयांच्या ग्रंथालयांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाचा वापर या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे. या संशोधनादरम्यान सुचविण्यात आलेले उपाय व सूचना या त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगास पाठविल्या होत्या.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या त्या पीएच.डी मार्गदर्शक म्हणून काम करतात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र नांदेड येथे त्यांनी काही वर्ष अध्यापनाचे कार्य केले आहे. तसेच महाराष्ट्र शासनातर्फे ग्रंथपालन प्रमाणपत्र या वर्गास त्यांनी अनेक वर्ष शिकविले आहे. उपलब्ध प्रतिकूल परिस्थितीत महिला महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचे संगणकीकरण त्यांनी केले.
लॉकडाउन काळात सोशल मीडियाद्वारे महाविद्यालयातील मुलींना सद्य परिस्थितीचे अद्यावत ज्ञान त्यांनी पुरविले आहे. वेबिनार द्वारे कार्यशाळा आयोजित करून महाराष्ट्रातील व इतर राज्यातील ग्रंथपालांना NAAC संबंधीच्या पूर्वतयारी चे मार्गदर्शन तज्ञा द्वारे देण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली होती त्यास भरपूर प्रतिसाद मिळाला होता.
ग्रंथपाल हा केवळ ग्रंथपाल नसून तो सामाजिक परिवर्तनाचा एक मोठा घटक आहे. हे तत्व अंगाशी बाळगून डॉ. मेधा धर्मापुरीकर यांचा सहभाग अनेक सामाजिक कार्यात असतो. ग्रंथपालना सोबतच महाविद्यालयातील अनेक विस्तारित सेवेत त्यांचा सहभाग हा महत्त्वाचा असतो. ग्रंथालय आणि माहितीशास्त्र संशोधन कार्यात सध्या त्यांच्याकडे दोन संशोधक कार्यरत आहेत. एका संशोकाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाचे कार्य यशस्वीपणे पुर्ण केले आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरीय मासिकात त्यांचे लेख प्रकाशित आहेत.
महाराष्ट्रातील निवडक ग्रंथपालाच्या मनोगतावर आधारीत डायमंड प्रकाशन, पुणे तर्फे प्रकाशित पूस्तकाचे संपादन त्यांनी केलेले आहे. मुक्ला न्यूज लेटरच्या मराठवाडा विभागाच्या संपादक पदी त्या सध्या कार्यरत आहेत. पुरस्कार वितरण ५ फेब्रुवारीला होणार आहे तर पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम स्मृती चिन्ह शाल श्रीफळ असे आहे.या पुरस्कारा बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ कामळजकर, डॉ. बाबूराव पावडे, प्राध्यापक, शिक्षक्केतर कर्मचारी व विभागातील सर्व ग्रंथपालांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.