नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. नाशिकमध्ये गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात दि.२७, २८ मार्च रोजी हे साहित्य संमेलन होणार आहे. यासोबतच आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उपाध्यक्षपदी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि कृषीमंत्री दादा भुसे यांचे नाव जाहीर करण्यात आले. ही नावे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी कॉलेजमधील संमेलनाच्या कार्यालयात आज सकाळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.
३९ समित्याही होणार जाहीर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या निवडीनंतर स्वागताध्यक्ष आणि निमंत्रकांची नेमणूक होणार असून, त्यानंतर स्वागत समिती व इतर अशा ३९ समित्या गठित केल्या जाणार आहेत. इतर समित्यांसाठी साहित्य संमेलनाच्या संयोजकांनी लोकांची नावे मागवली होती त्यालादेखील चांगला प्रतिसाद मिळत असून, संमेलनासाठी निर्धारित केल्या जाणाऱ्या ३९ समित्या लवकरच अस्तित्वात येणार आहेत. पालकमंत्री भुजबळ यांची स्वागताध्यक्षपदी, तर हेमंत टकले यांची निमंत्रकपदी निवड झाल्यानंतर खऱ्या अर्थाने संमेलनात रंग भरण्यास सुरुवात होणार आहे.