विजय कुलकर्णी/परभणी: तालुक्यातील मुरंबा येथील ८०० कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाला असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्या पाठोपाठ पेडगाव आणि सेलू तालुक्यातील कुपटा येथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करत परिसरातील कोंबड्या नष्ट करण्यात आल्या. प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यामुळे परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लू नियंत्रणात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेतस त्रिसदस्यीय केंद्रीय आरोग्य पथकाचे सदस्य उपस्थित होते. या पथकाने जिल्हाधिका-यांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्याबद्ल त्यांचे कौतुक केले.
बर्ड फ्लूच्या संसर्गासह इतर आरोग्या संबंधी माहिती घेण्यासाठी त्रिसदस्यीय केंद्राचे आरोग्य विभागाचे पथक परभणीत दाखल झाले. या पथकाने परभणी तालुक्यातील मुरुंबा, पेडगाव त्याचबरोबर सेलू तालुक्यातील कुपटा या गावी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच नागरिकांशी थेट संवाद साधत प्रशासनाने केलेल्या उपाययोजनासंदर्भात माहिती घेतली.
या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. मुुरुंबा येथील ८४३ कोंबड्याचा अज्ञात रोगाने मृत्यू झाला. या बाबीची गांभिर्याने दखल घेत जिल्हा प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागाने मृत्यू पावलेल्या कोंबड्या तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. या कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लू मुळे झाला असा निष्कर्ष प्राप्त होताच जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपायांवर भर देत १ कि.मी. परिसरातील कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश दिले. तसेच १० कि.मी. परिसरात खरेदी विक्री व्यवहारावर प्रतिबंध घालण्यात आला.
मुरंबा पाठोपाठ पेडगाव आणि कुपटा या गावी ४२६ कोंबड्यांचा मृत्यू झाला. नुकसान भरपाई म्हणून संबंधितांना कोंबड्यांची भरपाई तातडीने देण्यात आली. दरम्यान, केंद्राच्या आरोग्य विभागाच्या पथकात सेवा सल्लागार समितीचे डॉ. सुनिल खापर्डे डॉ. रोहितकुमार, विषाणू शास्त्रज्ञ डॉ. मनोहर चौधरी यांनी घटनास्थळास भेटी देऊन नागरिकांशी चर्चा केली. तसेच योग्य ती खबरदारी घेण्यासाठी मार्गदर्शक सुचनाही केल्या. व जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपायोजना केल्यामुळे बर्ड फ्लू नियंत्रणात आणण्यात मोठी मदत झाली.त्यांनी केलेल्या कार्याबद्दल प्रशंसनीय उद्गार काढले.