सुरेश शिंदे/ परतूर : तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने ३१ ग्रामपंचायती ताब्यात घेत एक हाती सत्ता मिळवली आहे. माजी मंत्री बबनराव लोणीकर व युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी गेल्या पाच-सात वर्षांपासून प्रत्येक गावांमध्ये विविध विकास कामे करून जनतेची मने जिंकली आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये परतूर तालुक्यातील जनतेने माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या पारड्यात वजन टाकत २५ हजाराच्या फरकाने त्यांना विजयी केले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज लागलेल्या ग्रामपंचायत निकालांमध्ये भारतीय जनता पार्टीने माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असल्याची चर्चा तालुक्यात होत आहे. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला होता मात्र या सामन्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
**बहुचर्चित सातोना ग्रामपंचायत भाजपच्या हाती **
पहिल्यांदा सातोना खुर्द ग्रामपंचायत वर भाजपचा झेंडा फडकला असून गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या ताब्यात असणारी सातोना खुर्द ही तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत यावेळी माजी मंत्री बबनराव लोणीकर व राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा नेते विलासराव आकात व रोहन आकात यांच्या नेतृत्वाखाली १५पैकी १२ जागांवर दणदणीत विजय संपादन करीत भाजपाचे वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपा ने ताब्यात घेतलेल्या ग्रामपंचायती सातोना खुर्द, बानाची वाडी, वैजोडा,बाबई, डोल्हारा नांद्रा रायपुर सोयनजना, सिरसगाव,माव,सेलगव, अकोली, लिखित पिंपरी,ब्राम्हणवाडी,को हदगाव,सुरुमगाव, परतवाडी,आसन गाव,संकनपुरी, सावरगाव, मसाला, हनवडी, श्रीधर जवळा, वाहेगव सातारा या सह 7 ठिकाणी स्थानिक आघाडी सह युती करून लढलेल्या ग्रामपंचायत मध्ये वर्चस्व सिद्ध केले आहे. दरम्यान विजयी उमेदवारांचे माजी मंत्री बबनराव लोणीकर प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी अभिनंदन केले आहे