सोलापूरः औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पातळीवर नामांतराचा प्रश्न गाजत आहे. शिवसेना व काँग्रेस हे दोन्ही पक्ष या मुद्द्यावरून समोरासमोर आले आहेत. तर भाजप शिवसेनेची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र यावर सावध भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रथमच या मुद्द्यावर त्यांचे मत व्यक्त केले आहे.
औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची शिवसेनेची मागणी आहे. इतर काही जणांचीही तशी मागणी आहे. पण कुठल्याही गावाचे किंवा शहराचे नाव बदलायचे असेल तर त्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना विश्वासात घेता आले पाहिजे. त्यांचे मत समजून घेतल्यानंतर जो काही निष्कर्ष येईल, त्यानुसार त्यांच्या मताला ताकद देण्याची जबाबदारी सरकारची असते, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
तरुणांचा प्रतिनिधी म्हणुन रोजगाराचा प्रश्न महत्वाचा वाटतो. तसेच लोकडाऊनच्या काळातील जनतेला आलेल्या वाढीव विज बिलाची शहानिशा करने गरजेच आहे, विज बिल कमी करण्या बाबत किवा वापरा ईतकेच विज बिल आकारण्यात बाबत विचार करायला हवा, असे त्यांनी सोलापूर येथे वृत्तवाहिन्यांशी बोलताना आपले मत मांडले.