सीसीआयची कापूस खरेदी या तारखेपर्यंतच

कापसाची आवक घटली...

सीसीआयची कापूस खरेदी या तारखेपर्यंतच

विजय कुलकर्णी/ परभणी : यंदाच्या हंगामातील सीसीआयची खरेदी शनिवार, १३ फेबु्रवारीपर्यंतच सुरू ठेवण्याचा निर्णय मानवत येथील केंद्रप्रमुखांनी घेतला आहे. या हंगामात सीसीआयने हमी दराने शेतक-यांचा कापूस खरेदी केल्याने तालुक्यातील, तसेच परिसरातील शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.

३० जानेवारीपर्यंत मानवत तालुक्यात सीसीआयने एकूण ३ लाख ९४ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. दुसरीकडे कापसाच्या भावात तेजी आल्याने जिनिंग व्यावसायिकांनी खाजगी खरेदी सुरू केली आहे. तालुक्यात ४३ हजार ९७ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. यामध्ये कापसाची २१ हजार ६३५ हेक्टरवर सर्वाधिक पेरणी झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी सीसीआयने हमीदाराने कापसाची खरेदी सुरु केली होती. परजिल्ह्यासह जिल्हाभरातील शेतकरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे यार्डात आपला कापूस विक्रीसाठी घेऊन येत असल्याचे चित्र दिसून येत होते. दररोज ८०० ते ९०० वाहन बाजार समितीचे यार्डात येऊ लागले. नोव्हेंबर, डिसेंबर, तसेच जानेवारी या तीन महिन्यांत शेतकरी मानवत केंद्रावर कापूस विक्री करण्यासाठी पसंती देत होते. दररोज दहा हजार क्विंटल आवकची नोंद कृषि उत्पन्न बाजार समितीकडे होत होती. डिसेंबरच्या सुरुवातीला लॉकडाउन जाहीर होणार असल्याची अफवा पसरल्याने शेतक-यांनी आपला कापूस बाहेर काढत सीसीआयला विक्री करण्याला पसंती दिली. ३० जानेवारीपर्यंत सीसीआयने ३ लाख ९४ हजार क्विंटल कापसाची हमीदराने खरेदी केली. मात्र, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कापसामध्ये टप्प्याटप्प्याने भाव वाढ होत असल्याचे चित्र दिसून आले. खुल्या बाजारात हमीदराएवढेच भाव मिळत असल्याने व कापूस विक्री केल्यानंतर खाजगी व्यापा-यांकडून रोख रक्कम मिळत असल्याने शेतकरी खासगी व्यापार्‍यांना आपला कापूस विक्री करून मोकळे होत आहेत. सद्यस्थितीत कृषि उत्पन्न बाजार समिती अंतर्गत ६ जिनिंग व्यावसायिकानी कापसाची खरेदी सुरू केली आहे. भाववाढीचा परिणाम सीसीआईच्या खरेदीवर झाला आहे. यामुळे सीसीआयचे केंद्रप्रमुख शंकरलाल गलगठ यांनी ८ फेब्रुवारी रोजी बाजार समितीला लेखी पत्र देऊन १३ फेब्रुवारीपासून सीसीआयची खरेदी कायमस्वरूपी बंद होणार असल्याची माहिती दिली.

यावर्षी कापूस हंगाम सुरू झाल्यानंतर सुरुवातीला नोव्हेंबर-डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांत कापसाची मोठ्या प्रमाणावर आवक बाजार समितीच्या यार्डात होती. मात्र, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून यार्डातील कापसाची आवक घटली असल्याचे चित्र दिसून येत आहे. दुसरीकडे कापसाचे भाव वाढल्यानेही कापूस राखून ठेवलेल्या शेतक-यांनी विक्रीचा मुहूर्त लांबविला कापसाची आवक घटल्याचे व्यापारी सांगत आहेत. आणखीन एक महिना कापसाची आवक होणार असल्याचे व्यापा-यांकडून बोलले जात आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.