बर्ड फ्लूचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक दाखल

परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लू या रोगामुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू

बर्ड फ्लूचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय  पथक दाखल

विजय कुलकर्णी/परभणी: बर्ड फ्लूच्या संसर्गासह इतर माहिती घेण्यासाठी केंद्राचे एक पथक मंगळवार दि.19 रोजी जिल्ह्यात दाखल झाले आहे. परभणी तालुक्यातील मुरूंबा, पेडगाव तसेच सेलू तालुक्यातील कुपटा येथील आढावा हे पथक घेणार आहे.

परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लू या रोगामुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला. यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला. मात्र, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी तातडीने घेतलेल्या निर्णयांसह प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यामुळे बर्ड फ्लू नियंत्रणात येण्यास मदत झाली आहे.

मुरूंबा येथील 843 कोंबड्यांचा अज्ञात रोगाने मृत्यू झाला होतो. तेथे जिल्हा प्रशासन व पशूसंवर्धन विभागाने तातडीने धाव घेत मृत्यू पावलेल्या कोंबड्या तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्या. कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लू मुळे झाला असल्याचा अहवाल प्राप्त होताच जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह मुरूंबा गावातील एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश दिले होते. तसेच दहा किलोमीटर परिसरात खरेदी-विक्रीसह अवागमनास प्रतिबंध घालण्यात आला होता.

मुरूंबा येथील बर्ड फ्लूचा संसर्ग आटोक्यात येत असतानाच सेलू तालुक्यातील कुपटा येथील 426 कोंबड्यांचा मृत्यू झाला. त्यांचाही अहवाल बर्डफ्लूमुळेच मृत्यू झाल्याचा आल्याने तेथेही उपाययोजना करण्यात आल्या. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे निश्चितच संसर्ग आटोक्यात आणता आला.

जिल्ह्यात संसर्ग झालेल्या या ठिकाणांची पाहणी करुन याचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाचे चार सदस्यीय पथक परभणीत दाखल झाले. ते पेडगावसह मुरूंबा व कुपटा या गावास भेट देऊन तेथील पाहणी करणार आहेत. या पथकात आरोग्य विभागाचे सार्वजनिक आरोग्य सेवा सल्लागार समितीचे डॉ. सुनील खापरडे, औषधशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रोहितकुमार, विषाणू शास्त्रज्ञ डॉ. मनोहर चौधरी तसेच औरंगाबाद येथील डॉ. प्रदीप मुरूमकर यांचा या पथकात समावेश आहे.

या पथकातील सदस्यांनी मंगळवारी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय यांच्यासह डॉ. काकासाहेब खोसे, डॉ. संतोष मोरेगावकर यांच्याशी चर्चा केली. बर्डफ्लूचा संसर्ग झालेल्या गावामधील परिस्थिती बाबत चर्चा केली. प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर भेटी दिलेल्यांशी त्यांनी चर्चा करत त्यांच्याकडून आढावा घेतला. त्याचबरोबर डॉ. प्रशांत सूर्यवंशी, डॉ. सतीश गायकवाड यांच्याशी रोग प्रसाराबाबत स्थलांतरीत पक्षांची भूमिका जाणून घेण्याच्या दृष्टीने चौकशी केली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.