परभणी : गंगाखेड येथील यज्ञभूमी वेद विद्यालयात आज मराठवाड्यातील ४१ बटूंवर उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यज्ञेवर सेलुकर महाराज यांच्यावतीने प्रतिवर्षी या सोहळ्याचे सामूहिक आयोजन केले जाते.सोळा संस्कारांपैकी एक असलेला उपनयन संस्कार महत्त्वाचा आहे. त्यामुळे वैयक्तिक खर्चाला फाटा देत सामूहिकरित्या गंगाखेड येथे प्रतिवर्षी हा सोहळा आयोजित केला जातो. मंगळवारी आयोजीत उपनयन संस्कार सोहळ्यामध्ये मराठवाड्यातील एकूण ४१ बटू वर उपनयन संस्कार करण्यात आले. उपनयन संस्कार करण्याचे काम वेदसंपन्न अग्निहोत्री सुधाकर शास्त्री महाराज यांच्या वाणीतुन बटूवर संस्कार करण्यात आले. याप्रसंगी बटूंना आशीर्वाद देण्यासाठी यज्ञ महर्षी यज्ञेवर सेलूकर महाराज, मीनाक्षीदेवी मायबाई यांच्यासह ब्रह्मवृंद उपस्थित होते. यावेळी शरद दलाल व क्रांती दलाल यांच्या वतीने ४१ बटूंना ब्लँकेट, संध्येसाठी आसन पट्टी, सतरंजी आदी साहित्य देण्यात आले. हा सोहळा यशस्वीकरण्यासाठी नंदकुमार डाळ, पांचाळ, शरद दलाल, गजानन पाठक, बाळासाहेब राखे, ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष संजय सुपेकर, सुहास पाठक, जोशी गुरुजी, शिवाजी पाठक, मंदार राखे यांच्यासह उपनयन विधी करण्यासाठी अतुल गुरुजी जोशी, अनिकेत पाठक, शाहू महाराज पाठक आदींनी परिश्रम घेतले.