नागपूरः इंधन दरवाढी विरोधात आणि कृषी कायदे रद्द करण्यासाठी कॉग्रेसने नागपूर राजभवनाला घेराव घालून आंदोलन केले. कृषी कायदे रद्द करावेत आणि इंधन दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी आज प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ट्रॅक्टर हजारो शेतकऱ्यांसह रॅली काढून नागपूर राजभवनला घेराव घातला. इंधनदरवाढीच्या निषेधार्थ शेकडो महिलांनी रस्त्यावर चुली मांडून भाकरी भाजून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध केला.
केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही आणि संसदेचे नियम पायदळी तुडवून आणलेले कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारे आहेत. या कायद्यांच्या माध्यमातून बड्या उद्योगपतींचे गुलाम असणारे पंतप्रधान आता शेतकऱ्यांनाही उद्योगपतींचे गुलाम बनवू पाहत आहेत. पण काँग्रेस पक्ष त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही अशी टीका राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
केंद्रातील भाजप सरकारने काळे कृषी कायदे व अन्यायकारक इंधन दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी आज @INCMaharashtra
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 16, 2021
कार्यकर्ते व शेतक-यांनी शेकडो ट्रॅक्टरसह नागपूर राजभवनला घेराव घातला. #KisanAdhikarDiwas pic.twitter.com/Zq8BjBrOEB
थोरात म्हणाले, मोदींनी काळे कायदे आणून शेतकऱ्यांना उद्धवस्त करण्याचा विडाच उचलला आहे. शेतकरी ५० दिवसांपासून ऊन, पाऊस, वारा, थंडीत आंदोलन करत आहेत. या कायद्यामुळे साठेबाजी, महागाई वाढणार, उद्योगपतींना मोठ्या प्रमाणात नफेखोरीची मुभा मिळणार आहे. या तिन्ही कायद्यांमध्ये शेतकऱ्यांच्या फायद्याचे काही नाही. पण केंद्र सरकारला शेतकऱ्यांचे काही देणे घेणे राहिलेले दिसत नाही. उद्योगपतींचे हित डोळ्यासमोर ठेवून हे कायदे बनवले आहेत. ५० दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे. भाजप सरकारच्या काळात कच्च्या तेलाचे दर प्रचंड घसरले असतानाही देशात दररोज इंधनाच्या किंमती वाढवून केंद्र सरकार सर्वसामान्याची लूट करत आहे. केंद्र सरकार जोपर्यंत काळे कायदे व इंधनदरवाढ मागे घेत नाही तोपर्यंत संघर्ष थांबवणार नाही असा इशारा थोरात यांनी दिला.