सुमित दंडुके / औरंगाबाद : शहरातील औरंगपुरा परीसरात गुरुवारी (दि.१४) रोजी रात्री दहाच्या सुमारास एका तरुणाची चाकुने भोसकुन हत्या करण्यात आली. हा तरुण कुख्यात गुंड होता. त्याच्यावर तब्बल १६ गुन्हे दाखल असुन एकदा तडीपारीची कारवाई देखील झालेली आहे. या खुनासंबंधी तीन संशयीत आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी दिली.
समीर खान सिकंदर खान (वय.२७, रा.टाऊन हॉल) असे मृत तरुणाचे नाव आहे. समीर आणि त्याचा मित्र रात्री दारु प्यायला शहरातील मार्केटमध्ये गेले, दारु पिऊन वापस जात असताना रस्त्यात तीघे आरोपी हे दुस-या दुचाकीवरुन जात होते. यावेळी समीरच्या गाडीचा धक्का लागल्याने यांच्यात वाद सुरु झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. याचदरम्यान तिघा आरोपी पैकी एकाने समीरवर धारदार शस्त्राने वार केले. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने समीरचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच सिटी चौक गुन्हे शाखा पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तिघा संशयितांना त्यांनी ताब्यात घेतले.