परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज अंतिम मुदतीत उमेदवारी अर्ज भरण्याकरिता परभणी व हिंगोली जिल्ह्यातील उमेदवारांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून काही निर्बंध लागू केले खरे. परंतु बाजारपेठांसह लग्नसराई तसेच सरकारी कार्यालयांमधूनसुध्दा त्या निर्बंधांचा परिणाम जाणवला नाही. त्याचे उत्तम उदाहरण जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सोमवारी शेतकी भवनात प्रकर्षाने दिसून आले. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक विभागाने ताफ्यानिशी या शेतकी भवनात सकाळपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली. सोमवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होणार हे ओळखूनसुध्दा निवडणूक विभागाने, सहकार खात्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत काडीचेही प्रयत्न केले नाहीत. त्याचा परिणाम शेतकी भवनात उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता उमेदवार, त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. सकाळी १०:३० वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत शेतकी भवनास जत्रेचे स्वरूप आले होते. त्यात बहुतांशी नेते, कार्यकर्ते मास्कविनाच होते. परंतु त्या मंडळींना रोखण्याकरिता कोणीही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळेच शेतकी भवनात सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टंसिंग वगैरे गोष्टी धाब्यावर बसवल्या गेल्याचे दिसुन आले.