मारहाणीत युवकाचा मृत्यू, उदगीर बंद

दोनशे युवकांच्या जमावाने केली शहरात दगडफेक

मारहाणीत युवकाचा मृत्यू, उदगीर बंद

माधव पिटले /उदगीर: पैशांच्या देवाण घेवाण कारणावरून आठ दिवसापूर्वी मारहाण झालेल्या एका युवकाचा शहरातील खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान सकाळी मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाइकांनी प्रेत उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर आणून ठेवत जोपर्यंत आरोपीला अटक करत नाहीत तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत जमावाने शहर पोलीस ठाण्यासमोर दगडफेक केली. या घटनेची माहिती शहरात कळताच अवघ्या अर्ध्या तासात शहर सामसूम झाले अनेक व्यापाऱ्यांनी दुकानेही बंद केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, उदगीर तालुक्यातील तोंडार ऑटो पॉईंट चौकात दि. १३ रोजी रात्री आठच्या सुमारास पैशाच्या देवाण घेवाण वादातून आरोपी तानाजी फुले, राजकुमार बिरादार रा. हैबतपुर महेश बिरादार, शांतवीर बिरादार रा. मलकापूर यांनी संगनमत करत लोखंडी गज, काट्या व हॉकी स्टिकने फिर्यादीचा चुलत भाऊ बशीर अहमद सय्यद वय वर्षे ३० रा. हैबतपुर याला तू घेतलेले पैसे परत कर म्हणत शिवीगाळ केली. आरोपीने मयताच्या डोक्यात व मांडीवर मारहाण करूण गंभीररित्या जखमी केले होते. तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली असल्याची फिर्याद चुलत भाऊ फिरोज निजामसाब सय्यद याने रविवारी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती.

आज सकाळी मारहाण झालेल्या युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर हा मृतदेह नातेवाइकांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर आणून ठेवत जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. मृूत्यूची बातमी शहरात पसरताच पोलीस स्टेशनच्या आवारात जमाव निर्माण झाला. तसेच पोलीस ठाण्यासमोर या जमावाने दगडफेक सुरू केली यात काही मोटारसायकल, भेळच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज केला.

जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बदलून जीवे मारले असल्याचा गुन्हा दाखल करून तात्काळ आरोपींना अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी या नातेवाईकांना दिले. त्यानंतर हा मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जाण्यात आला.
या घटनेचे वृत्त कळताच शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. चौबारा रोड, हनुमान कथा मुक्कावर, भाजी मार्केट परिसर, नगरपालिका ,शिवाजी चौक, मोंढा रोड ,देगलूर रोड या भागातील अनेक व्यापाऱ्यांनी आपले दुकाने तात्काळ बंद करत घरी जाणे पसंत केले. याचदरम्यान तातडीने उदगीर मध्ये दाखल झालेले अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी कुठल्याही अफवेला बळी न पडता नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

शहर पोलीस ठाण्याच्या आवारात मृतदेह आणून ठेवल्यानंतर काही वेळातच दोनशे ते अडीचशे लोकांचा जमाव तिथे जमा झाला होता. या जमावाला हळूहळू पोलीस ठाण्याबाहेर काढण्यात आले. पोलीस स्टेशन आवाराच्या बाहेर जाताच जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक करायला सुरुवात केली. यावेळी पेलिस स्टेशन मध्ये वीस पोलिस तैनात होते. संवेदनशील उदगीर तिथे दंगलीची पार्श्वभूमी असतानाही येथे सातत्यानं संख्याबळ कमी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

या मारहाणीच्या घटनेत युवक गंभीर जखमी झाला होता. रूग्णालयात उपचार चालू असताना चार दिवस गुन्हा दाखल केला नाही. या संबंधी उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन यांना नातेवाईकांशी विचारणा केली असता. सदरील घटना पोलीस विभाग पाठीशी घालत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.