विजय कुलकर्णी/ परभणी : शहरातील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम शहर महानगरपालिकेने हाती घेतली आहे. आज तिसऱ्या दिवशीही प्रशासकीय इमारत परिसरातील अतिक्रमणे काढली.
प्रशासकीय इमारत परिसरात गेल्या दोन-चार वर्षात छोट्या-मोठ्या आकाराची कच्ची अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर स्थिरावली होती. प्रशासकीय ईमारतीच्या परिसरातच ही अतिक्रमणे पक्की केली होती. आवारातील शासकीय जागेवरच अर्धाडझन पक्की अतिक्रमणे झाली होती. दीड-दोन डझन कच्ची अतिक्रमणे बिनधास्तपणे स्थिरावल्याचे चित्र दिसून येत होते. विशेष म्हणजे इमारतीच्या प्रवेशव्दारापासून थेट कार्यालयापर्यंत एजंटांनी धुमाकूळ घातला होता. परिणामी, या परिसरात अतिक्रमणकर्ते, व एजंटांच्या भाऊगर्दीने या परिसरास अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त होत होते. याबाबत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास संबंधित अतिक्रमणे तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारी सकाळपासूनच परिसरातील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली. संबंधित अतिक्रमणधारकांना यापुर्वीच सूचना दिल्या होत्या. त्यामुळे पथक दाखल होताच अनेकांनी स्वतःहून आपापले साहित्य उचलण्यास सुरवात केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता, तर बघ्यांचीही मोठी गर्दी यावेळी झाली होती.