विजय कुलकर्णी/ परभणी : दिल्ली येथील बजरंग दलाचा कार्यकर्ता रिंकू शर्मा याच्या हत्येप्रकरणातील आरोपींविरूध्द फास्टट्रॅक कोर्टात खटला उभारून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकार-यांमार्फत राष्ट्रपतींना पाठवलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.
विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांतमंत्री अनंत पांडे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हादराव कानडे पाटील, महानगराध्यक्ष राजकुमार भांबरे, जिल्हामंत्री सुनील रामपूरकर, गणेश काळबांडे, विश्वास दिवाळकर, महानगरमंत्री अभिजीत कुलकर्णी, शहरसहमंत्री विनोद लोलगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. त्याव्दारे दिल्लीतील मंगोलपुरी भागातील कार्यकर्ता रिंकू शर्मा याच्या हत्येचा निषेध व्यक्त केला आहे. श्रीराम जन्मभूमी निर्माण अभियानात निधी संकलनानिमित्त काम करणा-या शर्मा यांना मोहल्यातील काही युवकांकडून वारंवार धमक्या दिल्या जात होत्या. स्थानिक पोलिस ठाण्यात या अनुषंगाने तक्रारही दाखल झाली होती. परंतु दिल्ली पोलिसांनी संबंधितांविरूध्द कारवाई केली नाही, असे या शिष्टमंडळाने नमूद करीत स्थानिक पोलिस प्रशासन यातील आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोपही शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात केला आहे. शर्मा यांच्या हत्येत गुंतलेल्यांना फाशी द्यावी, अन्य हल्लेखोरांविरूध्द रासुका अंतर्गत कारवाई करावी, फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवावा, शर्मा कुटूंबियातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, असे या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.