परभणी : सेलू तालुक्यातील ५ महसूल मंडळ विभागांपैकी केवळ सेलू, कुपटा, चिकलठाणा, देऊळगाव गात या चार महसूल मंडळातच खरीप हंगाम काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई अनुदान जाहीर झाले आहे. परंतु वालुर महसूल मंडळातील २१ गावांना या अनुदान प्रक्रियेतून वगळल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. या गावांना अनुदान जाहीर करण्याच्या मागणीसाठी सेलू दबाव गटाच्या वतीने आज उपोषण करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाधिकारी कुंडेटकर यांनी निवेदन स्वीकारून १ मार्च पर्यंत योग्य कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. वालुर महसूल विभागातील गावे ही प्रामुख्याने दुधना नदीच्या किनाऱ्यालगत असून या महसूल मंडळात ऑक्टोबर महिन्यापर्यंत अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग आदी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत या विभागातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी नुकसणीबाबतचे पंचनामेही केले आहेत. तसेच यावर्षी झालेला सततचा पाऊस व लोअर दुधनातून दुधना नदीपात्रात दोनवेळा पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी शेतीमध्ये साचून वालुर मंडळातील २१ गावांमधील शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. याची माहिती व जाणीव तहसीलदार व कृषी अधिकारी यांना असतांनाही त्यांनी या नुकसानीकडे दुर्लक्ष करून या भागात अतिवृष्टी झालेली नाही अशी चुकीची माहिती शासनाकडे पाठविल्याचे कळते. त्यामुळे वालुर महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने व नदी नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे नुकसान झाले. तरीही केवळ चुकीच्या तांत्रिक माहितीच्या आधारे या मंडळातील २१ गावांना अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही. ही बाब वालुर मंडळातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे.
तालुक्यातील केवळ ९४ गावांपैकी ७३ गावे मदतीच्या निकषात बसल्याचे महसुल प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे. परंतु वालुर मंडळातील २१ गावांना जाणीवपूर्वक वगळले असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. यामुळे तातडीने या २१ गावांनाही शासनाने जाहीर केले प्रतिहेक्टरी १० हजार रु.प्रमाणे अनुदान द्यावे या मागणीसाठी आज उपोषण करण्यात आले. यावेळी दबाव गटाचे निमंत्रक अँड. श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, सतीश काकडे, जयसिंग शेळके, दत्तराव आंधळे, अँड.देवराव दळवे, सय्यद जलाल, विलास रोडगे, योगेश काकडे, मधुकर सोळंके, लक्ष्मण प्रधान, रामचंद्र कांबळे, गुलाबराव पौळ, दिलीप शेवाळे, मुकुंद टेकाळे, केशव डोईफोडे, रामप्रसाद शिंदे, इसाक पटेल, अँड.योगेश सूर्यवंशी आदी शेतकरी उपस्थित होते