सोनपेठ : महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह ऊर्जा सचिव व कार्यकारी अभियंता महावितरण यांनी नागरिकांची आर्थिक लुबाडणुक व फसवणुक केली असल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी मनसेच्या वतीने सोनपेठ पोलिस स्टेशनला पत्राद्वारे केली आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे देशभरात आणि विशेषत: महाराष्ट्रात दि.२२ मार्च ते दि.८ जून २०२० दरम्यान अतिकठोर टाळेबंदी होती. या काळात महावितरणकडून ना वीज मीटर रिडिंगसाठी प्रतिनिधी आले, ना वीज देयके वितरीत करण्यात आली. घरातच बंदिस्त असलेल्या जनतेला अचानक वापरापेक्षा तिप्पट-चौपट रक्कमेची अवाजवी भरमसाठ वीज बिले पाठवण्यात आली.वीज बिलांचे आकडे इतके मोठे होते की ग्रामीण भागातील व शहरी भागातील मध्यमवर्गीयांना ते भरणे शक्यच नव्हते.
मनसे सह इतर राजकीय पक्षांनी नागरिकांची दखल घेत. महाराष्ट्राचे ऊर्जामंञी नितीन राऊत यांच्याकडे वीजबिलांबाबतच्या तक्रारी मांडल्या वारंवार वीज कंपन्यांचे आधिकारी यांच्याशी बैठकाही घेण्यात आल्या. या बैठकीत ऊर्जामंञ्यांनी वीजबिल कपात करू असे आश्वासन दिले. त्यानंतर ऊर्जामंञ्यांनी आचानक घुमजाव केला आणि प्रत्येकाला वीज भरावीच लागेल असा आदेश काढला.
महावितरणकडून जनतेला दिलासा मिळण्याऐवजी आर्थिक पिळवणुकीला सामोरे जावे लागत आहे. राज्यातील नागरिकांना-ग्राहकांना अवास्तव अशी भरमसाठ वाढीव वीजबिल पाठवणे, वीजबिलांमध्ये दिलासा देण्याचं खोट आश्वासन देऊन सर्वसामान्य जनतेला महिनोमहिने झुलवत ठेवण आणि शेवटी राज्यातील सर्वसामान्य जनतेला वीज खंडित करण्याच्या धमक्या देवुन बेहिशोबी वीजबिलांची रक्कम वसुल करत असल्याने जनता भयभित होऊन जगत आहे. या सर्वप्रकारे महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंञी नितीन राऊत व महावितरण कंपनीचे प्रमुख आधिकारी हे जनतेची मानसिक लुबाडणुक व फसवणुक करीत असल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सोनपेठ पोलिस स्टेशनला निवेदनाद्वारे करण्यात आली.
या निवेदनावर मनसे तालुकाध्यक्ष नंदकिशोर रोडे, मनविसे तालुकाध्यक्ष मुन्ना बिराजदार, शहराध्यक्ष संदिप कांबळे, बापु कांबळे, भागवत खरात, जितेंद्र कुक्कडे, कृष्णा माने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.