विजय कुलकर्णी/परभणीः राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांची खा.फौजिया खान व अॕड. विजय गव्हाणे यांनी दि.२० रोजी मुंबईत भेट घेतली. परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तातडीने मंजुर करण्यात यावे तसेच त्यासाठी जमीन हस्तांतरित करण्यात यावी, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. यावेळी संजयकुमार यांनी शासन परभणीच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी अनुकूल असून लवकरच त्या संदर्भात योग्य ती कार्यवाही करीत असल्याचे सांगितले.
जागेच्या हस्तांतरणाच्या संदर्भात मा.आमदार विजय गव्हाणे यांनी मागील तीन दिवसांपासून अर्थ विभागात पाठपुरावा केला. त्यानंतर त्यांनी थेट संजयकुमार यांची भेट घेतली. परभणी येथे कोणत्याही परिस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले पाहिजे, असा आग्रह त्यांनी या भेटीत धरला. परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी सर्व परिस्थितीत अनुकूल असून विविध समित्यांनी त्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. केवळ शासनाने आता तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे नमूद केले. येत्या दि.२५ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलीक जिल्हा दौर्यावर येत आहेत. त्यावेळी त्यांची भेट घेणार असून वैद्यकीय महाविद्यालयाबाबत आंदोलन करण्यात येईल. तसेच लोकसहभागातून चळवळ उभारली जाणार असून पालकमंत्र्यांनाही साकडे घालणार आहे. या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे अॕड गव्हाणे यांनी सांगितले आहे