विजय कुलकर्णी/परभणीः स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी-कर्मचार्यांनी बुधवारी तालुक्यातील कारेगाव शिवारात सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकला. यावेळी पथकाने एक लाख ७८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. तर तिघांना ताब्यात घेतले.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांना कारेगाव शिवारात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून त्यांनी बुधवारी सायंकाळी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी आलेवार यांच्यासह कर्मचारी हनुमंत जक्केवाड, मधुकर चट्टे, बाळासाहेब तुपसुंदरे, हरिचंद्र खुपसे, अजर पटेल, शेख मोबीन, दिलावर पठाण आदींनी छापा टाकला. त्यावेळी तेथे काहीजण जुगार खेळत असल्याचे आढळले. पोलिस आल्याचा सुगावा लागताच तेथील चार जण अंधाराचा फायदा घेत फरार झाले. तर पथकाने तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८ हजार ८२० रुपये नगदी व तीन मोटारसायकल, दोन मोबाईलसह जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ७८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.