मुबंई : १४ फेब्रुवारी अर्थात व्हॅलेन्टाईन डे च्या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला सरप्राईज देण्याची लगबग चालु असते. पण हे करत असताना जरा तरुण तरूणींनो सावधान. व्हॅलेन्टाईन डे निमित्त फ्री कुपन अथवा फ्री गिफ्ट कार्ड मिळत असल्याच्या काही लिंक व्हॉट्सपअॅपवर व्हायरल होत आहेत, अशा लिंक या खोट्या असून नागरिकांनी त्यावर क्लिक करु नये असे आवाहन मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने केलं आहे.

सायबर सेलने ताज हॉटेलच्या नावाने व्हायरल होणाऱ्या अशाच एका संदेशाचा संदर्भ देऊन ही माहिती दिली आहे. व्हॅलेन्टाईन डे निमित्त फ्री कुपन आणि फ्री गिफ्ट देण्यात येत असल्याचा तो संदेश खोटा आणि फसवणूक करणारा असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलंय. ताज हॉटेलच्या वतीनेही हा संदेश खोटा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं असून यावर पोलिसांनी कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे.