हिंगोली : जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या नावाने हिंगोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश व आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यासंदर्भातचा बनावट आदेश सोशल मीडियावर जाहीर झाल्यानंतर खळबळ उडाली होती. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस विभागाला तपासाचे आदेश दिले होते. या तपासणीमध्ये सदर बोगस आदेश बनविणारा हा जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी असल्याची बाब निष्पन्न झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली असून यासंदर्भात जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जमावबंदी आदेश लागू करण्यासंदर्भात तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केल्याबाबत चा बनावट आदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. व्यापारी वर्गासह सामान्य नागरिकांनी याची खातरजमा न करता सदर आदेशाची प्रत मित्रांना पाठवल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले होते.
दरम्यान एनलायझरच्या वतीने सदर आदेश बोगस असल्या संदर्भातची पुष्टी करून बातमी प्रसारित केल्या करण्यात आल्यानंतर अनेकांचा जीव भांड्यात पडला होता. दरम्यान याबाबत जिल्हाधिकारी जयवंशी यांनी पोलीस विभागाला तात्काळ तपास करण्याचे आदेश दिले होते. अखेर शुक्रवारी रात्री पोलिसांनी यासंदर्भातची चौकशी पूर्ण करताना सदर बनावट आदेश हे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याकडून पाठविण्यात आल्याचे निष्पन्न केले. यासंदर्भातला चौकशी अहवाल पोलिस विभागाकडून जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी जयवंशी यांच्याशी संपर्क साधला असता सदर प्रकरणी चौकशी अहवाल प्राप्त झाला असून संबंधित कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.