विजय कुलकर्णी/परभणी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पालकमंत्र्यांनीही हिरवा कंदिल दाखवला असुन आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असल्याची माहीती पालकमंत्री नवाब मलिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परीषदेत दिली.
यावेळी जिल्हाधिकारी दिपक मुंगळीकर, पोलिस अधीक्षक जयंत मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरगोजे यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री मलिक म्हणाले की, परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व सरकारही अनुकुल आहे. लवकरच याबाबतचा निर्णय शासनाच्या वतीने जाहीर होईल. दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी परभणीत संघर्ष समिती स्थापन झाली असुन याप्रश्नी समितीच्या वतीने वेळोवेळी आंदोलने तसेच मंत्र्यांना निवेदन देणे सुरु आहे. यासंदर्भात २४ जानेवारी रोजी सर्वपक्षीयांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते. याठिकाणी पालकमंत्री नवाब मलिक यांनी आंदोलनस्थळी भेट दिली होती. आज जिल्हा नियोजन समितीमध्ये यासाठीची शिफारस करण्यात आली आहे.
प्रजासत्ताकदिनी खासदारांच्या नेतृत्वात आंदोलन
दरम्यान याच प्रश्नावर उद्या शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी खा.जाधव यांनी सर्पक्षियांसह व्यापा-यांच्याही भेटी घेतल्या आहेत.