परभणीत दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६९.६८ टक्के मतदान

झरी येथे मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस

परभणीत दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६९.६८ टक्के मतदान

विजय कुलकर्णी / परभणी : जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतीसाठी होत असलेली मतदानाची प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. सुरुवातीच्या ४ तासात २९.७९ टक्के एवढे मतदान झाले होते. दरम्यान, परभणी तालुक्यातील झरी येथे मतदारांना मतदानासाठी पैसे वाटप करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात ४१ हजार रुपये रोख, प्रचाराचे साहित्य, मतदारांची यादी यासह ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दु ३.३० वाजेपर्यंत ६९.६८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या झरी येथे नेहमीच निवडणुकी दरम्यान काही ना काही वाद होत असतात. या ठिकाणची निवडणूक देखील चुरशीची होत असते. मात्र यावेळी या ठिकाणी चक्क नागरिकांना मतदान करण्यासाठी पैसे वाटप करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला. मध्यरात्री पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान या ठिकाणी असलेल्या बाजार परिसरात ४ जणांना पकडून त्यांच्याकडून ४१ हजार रुपये रोख, प्रचाराचे साहित्य आणि मतदारांची नावे लिहिलेली यादी ताब्यात घेतली. तसेच या कारवाईमध्ये पोलिसांनी खालिद सरवर कुरेशी, कचरुबा त्र्यंबकराव जगडे, किरण प्रकाशराव देशमुख आणि नारायण रामकिशन गवळी या चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अंगद मुरकुटे करत आहेत.

परभणी तालुक्यात ७५.८५ टक्के, सेलूत ७२.४१ टक्के, जिंतूर ५२.१४ टक्के, पाथरी ७०.०६ टक्के, मानवत ७२.७३ टक्के, सोनपेठ ७१.४४ टक्के, गंगाखेड ७१.६५, पालम ७३.४५ टक्के तर पूर्णा तालुक्यात ७२.९७ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी दिली. एकूण २ लाख ३० हजार ५६५ महिला मतदार, तर पुरूष मतदार दोन लाख ३७ हजार ९६८ एकूण चार लाख ६८ हजार ५३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.