विजय देशमुख /निटूरः निटूर व पंचक्रोशीतील आराध्य दैवत असलेल्या सादनाथ महाराज मंदिरामध्ये सभा मंडपाच्या कामाचे उद्घाटन छत्रपती शाहू विद्यालयाचे प्राचार्य अनिल सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंकज कुलकर्णी, विजय देशमुख, बाळकृष्ण डांगे, राम साळूंके, दत्ता शिंदे, बालाजी अंबेगावे, सोमा बुडगे, प्रभू किणे, विठ्ठल चौधरी, माधव सोनटक्के इ.उपस्थित होते.
निटूर येथे जाज्वल्य देवस्थान म्हणून सादनाथ महाराज मंदिराची ख्याती आहे. या ठिकाणी दोन वर्षापासून विविध स्वरूपाचे सुशोभीकरणाचे कामे सुरू आहेत. आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी ग्रामविकास मंत्रालया अंतर्गत मुलभूत सुविधा यामधून सभामंडपासाठी आठ लाख रूपयाचा निधी मंजूर केला होता. मंदिरामध्ये सभामंडपाची गरज असल्याची मागणी मंदिर समितीच्या वतीने आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे करण्यात आली होती त्यामुळे त्यांनी हा निधी तात्काळ मंजूर केला. अनिल सोमवंशी यांच्या हस्ते आज सभामंडपाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले तसेच सांबस्वामी मंदिरामध्ये ही पाच लाखाच्या सभामंडपाच्या कामाचे उद्घाटन पंकज कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या दोन्ही मंदिरातील कामाला सुरूवात झाल्याने ग्रामस्थ मंडळींमध्ये समाधान व्यक्त होत आहे.