विजय कुलकर्णी/परभणीः परभणी शहर महानगरपालिकेच्या नियोजनशुन्य कारभारामुळे परभणीतील बहुतांश भागात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. 'धरण उशाला आणि कोरड घशाला' अशी काहीशी स्थिती परभणीकरांची आहे. पाणी उपलब्ध असुनही फक्त आणि फक्त मनपाचा नियोजनशुन्य कारभार भोवतो आहे. परिणामी नागरिकांना निर्जळीला तोंड द्यावे लागत आहे.
शहरातील राजगोपालाचारी उद्यान येथील नवीन जलकुंभाचे काम पूर्ण झाले असून राहटी येथून येणार्या रायझिंग लाईनला क्रॉस कनेक्शन देण्याच्या कामास विलंब होत आहे. दरम्यान, शहरातील प्रभाग क्रमांक ३, ४, ५, ६, ७ व प्रभाग क्रमांक १५ मध्ये ४ फेब्रवारीपर्यंत पाणीपुरवठा होणार नाही, असे महापालिका प्रशासनाने म्हटले होते. परंतु अद्यापही काम पूर्ण झाले न झाल्याने पाणी मिळालेच नाही. लाखो रुपये खर्च करून शहर महानगरपालिकेने परभणी शहरासाठी पाणीपुरवठा योजना आणली. परंतु त्याचा काडीमात्र उपयोग परभणीकरांना होताना दिसत नाही.
तब्बल १८ ते २० दिवसांचा कालखंड उलटल्यानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी परभणीकरांना भटकावे लागत आहे. शहरातील प्रभाग क्र. १५ मधील राजगोपालचारी उद्यानात पाण्याच्या टाकीचे नवीन बांधकाम झाले आहे. हे बांधकाम गेल्या अनेक वर्षापासून सुरुच आहे. परंतु अद्यापही याचा उपयोग परिसरातील पाणीपुरवठ्यासाठी झाला नाही. टाकीचे बांधकाम पूर्ण झाले असून यातून आता परिसरात पाणीपुरवठा होणार असल्याची चर्चा आहे. परंतु या सबबीखाली गेली अनेक दिवस नळाला पाणी सोडण्यात आले नाही. परभणी शहराला पाणीपुरवठा करणार्या येलदरी धरण व राहटी बंधार्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. तरीही १५ ते २० दिवस नळाला पाणी येत नाही. शहर मनपाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी शहरातील नानलपेठ परिसरात पिण्याचे पाणी सोडण्यात आले. परंतु पिवळ्या रंगाचे आणि दुषित पाणीपुरवठा झाला. यावेळीही नागरिकांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे परभणीकरांना मुबलक पाणीसाठा असूनही तहानलेलेच रहावे लागत आहे. याकडे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
येथील राजगोपालाचारी उद्यानात उभारण्यात आलेल्या नवीन जलकुंभात पाणी सोडून १२ फेब्रुरवारी रोजी चाचणी घेण्यात आली. येथील राजगोपालाचारी उद्यानात सुजल योजनेतून २४ लाख ५५ हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात आला आहे. या जलकुंभाला राहाटी येथून आलेल्या मेन रायझिंग लाईनची जोडणी देण्याचे काम पूर्ण झाले. त्यामुळे आयुक्त देविदास पवार यांनी प्रत्यक्ष जलकुंभात पाणी सोडून चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. १२ फेब्रुरवारी रोजी ही चाचणी करण्यात आली. यावेळी जीवन प्राधिकरणाचे अधिकारी गोपाळकृष्ण देशमुख, पाणीपुरवठा विभागाचे बालाजी सोनवणे, एजाज सय्यद, प्रकल्प अभियंता बाळासाहेब पोरे, कंत्राटदार स्वप्नील बचाटे, संकिर्ण विभागप्रमुख राजकुमार जाधव यांच्या उपस्थितीत ही चाचणी करण्यात आली आहे.