विजय कुलकर्णी /परभणी : मागील दीड वर्षापासून कोविड- १९ मुळे जी सर्व स्तरावर अस्वस्थता होती त्या अस्वस्थतेला आजच्या लसीकरण शुभारंभामुळे पूर्णविराम मिळाला आहे. ज्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या काळात कोविड- १९ बाधितांवर उपचार केले.त्या आपल्या सर्व आरोग्य सेवकांपासून या लसीकरण मोहिमेचा प्रारंभ होत आहे.
कोविड सेंटरमधील भूलतज्ज्ञ डॉ. दुर्गादास पांडे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी स्वत: ही लस सर्व प्रथम घेऊन परभणी जिल्हावासियांमध्ये नवा विश्वास निर्माण केल्याच्या भावना जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी व्यक्त केल्या. जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा शुभारंभ आज जिल्हा सामान्य रुग्णालयात झाला, यावेळी ते बोलत होते. खा. फौजिया खान, खा. संजय जाधव, आ. सुरेश वरपूडकर, जिल्हाधिकारी दी. म. मुगळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे व आरोग्य विभागाची टिम यावेळी उपस्थित होती.
जिल्ह्यातील सुमारे १० हजार ८०० सेवकांची, रक्षकांची नोंदणी या लसीकरणासाठी झाली असून जिल्ह्यात ४ ठिकाणी लसीकरण केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. आज प्रत्येक केंद्रावर १०० याप्रमाणे एकुण ४०० लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी स्पष्ट केले.
जिल्हा रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागात कोरोना लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नोंदणी कक्ष, निरीक्षण कक्ष व लसीकरण कक्ष अशा ३ कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. सर्वप्रथम नोंदणी करून लसीकरण कक्षात प्रवेश दिला जाईल त्यानंतर लसीकरण केल्याच्यानंतर जवळपास ३० मिनिटे त्या उमेदवारास निरीक्षण कक्षात तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवले जाणार आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.
प्रधानमंत्री मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणाची सुरुवात करुन संवाद साधला. याबाबतचे थेट प्रक्षेपण संगणकीय पडद्यावर यावेळी सर्व मान्यवर व आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पाहिले. कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, डॉ. डाके, डॉ. खंदारे, डॉ. धूतमल यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.