माधव पिटले/निलंगा: गावाकडे जाण्याची सोय व्हावी याकरिता तळीरामाने चक्क महामंडळाची बसच पळविल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी बसस्थानकात दि. 4 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री मुक्कामी असलेली बस अज्ञात तळीरामाने गावाकडे जाण्याची सोय व्हावी या उद्देशाने चक्क बसच पळवली आहे.औराद शा. येथे मुक्कामी असलेली निलंगा आगाराची बस पळवून स्वताचे गाव गाठले परंतु बस चालक असलेल्या तळीरामाने महामंडळाची बस पळविण्याबरोबर वीज खांबाची तोडफोड करून स्वताची गाव गाठण्यात धन्यता मानली. मात्र याबाबत औराद शा.पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.तळीरामाने पळवलेली बस रात्रीच मिळाल्याने प्रशासनाकडून पंचनामा करून महामंडळाच्या ताब्यात दिली.
याबाबत पोलिस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, निलंगा आगारातील एम.एच.20 बी एल 0271 क्रमांकाची बस दि 4 फेब्रुवारी रोजी रात्री निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील बसस्थानकात मुक्कामी थांबवून वाहक व चालक बसस्थानकात झोपले होते . ही मुक्कामी असलेली बस अज्ञात तळीरामाने रात्री 2 .30 च्या दरम्यान घेऊन गेली.सदर घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला कळवताच पेट्रोलिंग करीत पोलीस प्रशासनाची गाडी शेळगी येथे गेली असता तिथे ही बस सापडली . तळीरामाने पळविलेल्या बसचा पंचनामा करून महामंडळाच्या ताब्यात देण्यात आली. मात्र याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल न केल्यामुळे औराद शा.पोलिसावर संशय व्यक्त केला जात आहे.
यासंबंधी आगार प्रमुख युवराज थडकर याना संपर्क साधला असता ते म्हणाले औराद शा.बस स्थानकात निलंगा आगाराची बस गाडी ही अज्ञात व्यक्ती कडून पळवून नेल्याबाबत ठाण्यात तक्रार दिली असल्याचे त्यांनी सांगितले. तर औराद शा.पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर सुर्यवंशी म्हणाले की औराद शा.बस स्थानकात निलंगा आगाराची सोडण्यात आलेली बस गाडी औराद शा.मुक्कामी होती. परंतु याबाबत संबंधित चालकाने कोणतीही लेखी तक्रार न देता केवळ तोंडी माहिती सांगून चालक निघून गेला. त्यामुळे सदर प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.