प्रद्युम्न गिरीकर/हिंगोलीः शहरांमध्ये कुठल्याही असलेल्या महापुरुषांच्या प्रतिमा ह्या त्या शहराची शोभा वाढविण्याचे काम करतात, शिवाय त्यांच्या स्मारकाच्या माध्यमातून जनतेने त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा हाच त्यामागील महत्त्वाचा उद्देश असतो. परंतु हिंगोली शहरातील बॅनरबाज लोकप्रतिनिधी आणि उपटसुंभ नेत्यांनी आपल्या कौतुकाचे बॅनर लावून शहरातील महापुरुषांना कैद करून टाकले होते. अखेर हिंगोली नगरपरिषदेने या बॅनरबाजी विरुद्ध कारवाई करीत शहरातील सर्व बॅनर काढल्यामुळे महापुरुषांची सुटका झाल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली.
शहरातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या महात्मा गांधी चौक स्मारकाचे नगरपरिषदेच्या वतीने सुशोभिकरण करण्यात आले आहे. सुशोभीकरनानंतर या स्मारकाचा परिसर उजळून निघाला. परंतु बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे अनेक राजकीय पुढारी आणि नुकतेच उगवलेले युवा नेत्यांनी आपल्या वाढदिवसाच्या आणि कार्यकर्तृत्वाच्या कौतुकाचे बॅनर पुतळ्याच्या चारी बाजूंनी लावून टाकले. हीच परिस्थिती नांदेड नाका परिसरात असलेल्या अग्रसेन महाराज यांच्या पुतळ्यासमोर निर्माण झाली होती. नेत्यांचे बॅनर एवढ्या प्रचंड आकाराची लावण्यात आले की महापुरुषांची प्रतिमा यामुळे झाकल्या गेली. परिणामी हे पुतळे आदर्श घेण्यासाठी आहेत की नेत्यांचे बॅनर लावण्यासाठी असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडू लागला होता. त्यामध्ये लोकप्रतिनिधींनी आणलेल्या विकास कामांचे कौतुक असो की नव्याने उगवत असलेल्या युवानेत्यांच्या वाढदिवसाचे बॅनर असो यामुळे जनता देखील कंटाळली होती. जनतेची हीच भावना लक्षात घेऊन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांनी याबाबतीत कारवाईचे आदेश दिल्यानंतर संबंधित चौकामधील सर्व बॅनर काढण्यात आले. महापुरुषांची यामुळे मुक्तता झाली. येणाऱ्या काळात देखील अशा स्वरूपाचे बॅनर पुन्हा लागणार नाहीत अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेमधून व्यक्त होत आहे.