परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आ. बाबाजानी दुर्राणी, भाजपा आ.तानाजी मुटकुळे यांनी आज आपापला उमेदवारी अर्ज दाखल केला.
आ. दुर्राणी यांनी एकूण तीन अर्ज दाखल केले आहेत. पाथरी विविध कार्यकारी सेवा सहकारी व धान्य अधिकोष या गटातून दुर्राणी यांनी अर्ज दाखल केला आहे. आ. मुटकुळे यांनी हिंगोली विविध कार्यकारी सेवा सहकारी व धान्य अधिकोष गटातून अर्ज दाखल केला.
दरम्यान, बालासाहेब देसाई यांनी पूर्णा विविध कार्यकरी सेवाभावी संस्था या धान्यकोष गटातून अर्ज दाखल केला असून अरुण गुंडाळे व दत्तात्रय मायंदळे यांनीही अर्ज दाखल केले आहेत. १५ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली. त्यादिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. परंतु दुसर-या दिवशी म्हणजे १६ फेब्रुवारी रोजी सुरेश वडगावकर, गंगाधर कदम, पंडीतराव चोखट, अंबादासराव भोसले, आकाश चोखट, पांडूरंग डाखोरे, गणेशराव रोकडे आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.