पुणे : आयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी प्रत्येक जण निधी देत आहे. यात राष्ट्रवादी काॅंग्रसचे आमदार सुनिल शेळके यांनी दहा लाख रुपयांचा धनादेश निधी राम जन्मभूमी जिल्हा संयोजकांकडे दिला आहे. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथे प्रभू राम जन्मभूमी मंदिर निर्माण कार्य होत आहे. राम जन्मभूमीवर भव्य मंदिर म्हणजे भारतीय मनाची शाश्वत प्रेरणा आहे. राम मंदिर भव्य बनण्याबरोबरच जनतेच्या हृदयात श्रीराम आणि त्यांच्या जीवन मूल्यांची प्रतिष्ठापना व्हावी, या अनुषंगाने सर्वात मोठ्या निधी समर्पण अभियानाची सुरुवात होत आहे. आज संपूर्ण जगभरातून प्रत्येकजण अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी निधी संकलन करून यथाशक्ती योगदान देत आहे. यात मला सुद्धा या पवित्र कार्यात सहभागी होण्याचे भाग्य मिळाले याचा अभिमान आहे. असे आ.शेळके यांनी फेसबुक वरुन सांगितले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, जि.प.सदस्य, सभापती कृषी व पशुसंवर्धन समिती बाबुराव वायकर, धनाजीराव शिंदे कार्याध्यक्ष विश्व हिंदू परिषद, प्रदीप शामराव देसाई जिल्हा सहसंयोजक, संतोषभाऊ भेगडे पाटील सहसंयोजक अभियान, कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, रमेशजी लोणकर पुणे जिल्हा निधीप्रमुख, ह.भ.प. गोपीचंद महाराज कचरे अध्यक्ष बजरंग दल, संदेश भेगडे संयोजक बजरंग दल, अमित भेगडे, महेंद्र असवले, अमोल पगडे यांची उपस्थिती होती.