विजय कुलकर्णी/परभणीः स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाच्या अधिकारी - कर्मचार्यांनी मोटरसायकल चोरट्यांचे एक रॅकेट उघडकीस आणले असून चार आरोपींना अटक करीत त्यांच्याकडून १६ मोटरसायकल जप्त केल्या आहेत.
परभणी शहरातील शेख इरफान शेख जलील (रा.नूतन नगर,हाडको) व शेख जुनेद शेख रियाज (रा. वांगीरोड) या दोघांना स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाच्या एका पथकाने सापळा रचून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. पोलिस खाक्या दाखवुन विचारपुस केली तेव्हा या दोघांनी राजगोपालाचारी उद्यान, तसेच पूर्णा, ताडकळस, चुडावा, पालम व गंगाखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मोटरसायकल पळविल्याची कबुली दिली. चोरलेल्यांपैकी पाच मोटरसायकल कमी किंमतीत विकल्याचे नमुद केले. या दोघा आरोपींकडून या पथकाने ११ मोटरसायकल जप्त केल्या. पाठोपाठ मोहमद ताहेर चाऊस व सय्यद वली सय्यद (दोघेही रा. पालम) यांना त्या मोटरसायकल विकल्याचे तपासातून पुढे आल्यानंतर पथकाने त्या दोघांना ताब्यात घेतले. एकूण १६ मोटरसायकल पोलिसांनी जप्त केल्या. मोटरसायकल चोरीचे एक मोठे रॅकेटच उघडकीस आले असून मोटरसायकलची चोरी करणारे व चोरीची मोटरसायकल विक्री करण्याकरिता ग्राहक शोधणारे अशा आरोपींचा या टोळीत समावेश आहे.
दरम्यान, या कारवाईत जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, अप्पर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, परिविक्षाधीन पोलिस उपाधीक्षक बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक गुलाब बाचेवाड, फौजदार साईनाथ पुयड, हनुमंत जक्केवाड, बालासाहेब तुपसुंदरे, अरूण पांचाळ, अजहर शेख, हरिचंद्र खुपसे, दिलावर पठाण, सय्यद मोबीन, रंजीत आगळे, किशोर चव्हाण, संतोष सानप, कृष्णा शिंदे, संजय घुगे, बालाजी रेड्डी, रविंद्र भूमकर, रंजीत आगळे, संतोष व्यवहारे, पोदार यांनी या कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान, जुन्या मोटरसायकल खरेदी करतेवेळी ग्राहकांनी सर्व मूळ व पूर्ण कागदपत्रे हस्तगत करावीत, लालसेपोटी कमी किंमतीत मोटरसायकल विक्रीच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक आलेवार व बाचेवाड यांनी केले आहे.