विजय कुलकर्णी/ परभणी : लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरुन एका ३५ वर्षीय व्यक्तीचा बेदम मारहाण करुन खून करण्यात आल्याची घटना दि.३० जानेवारी रोजी ८.३० च्या सुमारास गौस कॉलनी दर्गा रोड येथे घडली.
याप्रकरणी कोतवाली पोलिसात १० आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार ३० जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजता फिर्यादी अहमद खान यांच्या राहत्या घरी आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमवून दुपारी झालेल्या लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून अहमद खान यांच्या पत्नी,आई व बहीण यांना शिवीगाळ करून मारहाण केली.
जीवे मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी लाकडी काठ्या, दगड व लोखंडी रॉडने अहमद खान व त्यांचे नातेवाईक यांना मारहाण केली. त्यात अहमद खान यांचे भाऊ माजिद खान (३५) यांना डोक्यावर जबर मारहाण झाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. याबाबत मृतकांचे भाऊ अहमद खान सलीम खान (रा.गौस कॉलनी, दर्गा रोड परभणी) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी सय्यद नकिद, सय्यद मोईन, हाश्मी, सय्यद अब्दुल रहमान, सय्यद जिलानी, सय्यद अब्दुल इब्राहीम व इतर दोन ते तीन अनोळखी इसम (रा.परभणी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.