विजय कुलकर्णी/परभणीः सेलूतील मोंढा भागात सतत बिट बंद असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. बाजार समितीचे देखील याकडे दुर्लक्ष होत आहे.
सेलुचा मोंढा एकेकाळी खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध होता. परिसरातील जवळपास २५ ते ३० खेड्यातील शेतकरी येथे माल विक्रीसाठी आणतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून व्यापारी बिटच काढत नसल्यामुळे माल विक्री होत नाही. व्यापारी मात्र परस्पर फडिवरील व इतर मालाची खरेदी करीत आहेत. परंतु यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला भाव योग्य मिळत नाही. सध्या बाजार समितीमध्ये प्रशासक असल्यामुळे त्यांचे देखील इकडे दुर्लक्ष होत आहे. शेतकरी बांधव मात्र दररोज बिटाच्या प्रतीक्षेत असतात. परंतु त्यांचा नाईलाज होत आहे. याच बरोबर व्यापारी माल खरेदी करताना एक किलोचा कडता म्हणून माल जास्त घेतात.
तसेच हमालीसाठी अर्धा किलो माल काढून घेतला जात आहे. असा एक क्विंटलच्या मागे दीड किलो माल जास्त घेतला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. तरी याबाबत प्रशासकांनी शेतकऱ्यांच्या या अडवणुकीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. नाही तर यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधुन व्यक्त होत आहे.