औसा: औसा शहरातील हाश्मी चौका जवळ बसच्या मागच्या चाकाखाली येऊन दुचाकीवरील एक युवक जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. 2 फेब्रुवारी मंगळवार रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
या बाबत माहिती अशी की, येथील ओम व्यंकट थोरात (वय 23 रा. भोई गल्ली,औसा )व बालाजी राजेंद्र कदम (वय 21 गणेश नगर,औसा ) हे दुचाकीवरून हाश्मी चौकाकडे, अँप्रोच रोडने जात असताना गर्दीमुळे त्यांची दुचाकी त्याच लाईनमध्ये जात असलेल्या एका टेम्पो क्र. एमएच - 24/एयु-0198 ला पाठीमागून धडकली. टेम्पोच्या बाजूनेच एमएच- 20/बीएल- 2216 ही बस जात होती.
टेम्पो आणि बस मध्ये यांची दुचाकी जात होती व टेम्पोला दुचाकी धडकल्यामुळे हे दोघेही खाली पडले आणि बाजूने जात असलेल्या बसच्या मागच्या चाकाखाली ओम थोरात सापडला. तर बालाजी कदम थोडे बाजूला पडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. यात ओम थोरात याचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तातडीने औसा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता ओमला डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर बालाजी कदम याला पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले आहे. या घटनेचा पंचनामा औसा पोलिसांनी केला असून तरुणाच्या अपघाती निधनामुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.