परभणी : ग्रामीण भागात अजूनही बरेचसे लोक शौचासाठी उघड्यावर जातात. याच उघड्यावरच्या हागणदारी मुळे हिवताप, टायफाईड, कॉलरा, हत्तीरोग इत्यादी रोगांचा शिरकाव ग्रामीण भागात होत असल्याचे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी सांगितले.
आज हरित ग्राम म्हणून प्रसिद्ध असलेल्या मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक या ग्रामपंचायतीत 'माझा गाव सुंदर गाव' आणि 'आमचा गाव आमचा विकास' या अभियानांतर्गत मानवत तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांसाठी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी टाकसाळे बोलत होते.
यावेळी त्यांनी गावातील शाळा अंगणवाडीला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्मृति उद्यानाची देखील पाहणी केली. उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले, सरपंच मंडळीबरोबर लोकप्रतिनिधींनी आपसातील मतभेद विसरुन गाव विकासासाठी प्रयत्न करावेत, आपण जसं शेतीचा शिवार चांगला ठेवतो तसाच गावाचा परिसर देखील सुंदर ठेवला पाहिजे, गावाशेजारी शौच विधी केल्यामुळे माशा, जनावरे, हवा, पाणी यांच्यामार्फत गावामध्ये रोगांना आमंत्रण मिळते. त्यामुळे शौचालयाचा नियमित वापर करावा, गावातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने शोषखड्डे तयार करावेत, शेतातील वन्यजीवांसाठी पाणवठे उभारावेत अशा विविध विषयाबाबत धार्मिक दृष्टांत देत ग्रामीण बोली भाषेत त्यांनी संवाद साधला. यावेळी स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तूबाकले, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, हरीश बुटले, विठ्ठल भिसे, कार्यकारी अभियंता गंगाधर यंबडवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कैलास घोडके, जि. प. सदस्य राजेश पवार, सभापती प्रमिला उक्कलकर, गट विकास अधिकारी सुनिता वानखेडे, उपसभापती कमल हिंगे, गटशिक्षणाधिकारी संजय ससाणे, सरपंच जयश्री साठे उपसरपंच प्रतिमा यादव यांच्यासह तालुक्यातील सरपंच ग्रामसेवक ऊपस्थित होते.