विजय कुलकर्णी/परभणी : शहरातील वसमत रोडवरील काही भागात मागील १६ दिवसांपासून निर्जळी आहे. यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असून महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे दर दोन-तीन महिन्याला अशा पद्धतीने विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या प्रभागात असा विस्कळीत पाणीपुरवठा झाल्यास ते खपवून घेतील काय? असा सवालही काही ज्येष्ट नागरिकांनी व्यक्त केला आहे.
मागील १६ दिवसांपासून नळाला पिण्याचे पाणी आले नाही. यामुळे महिलावर्ग त्रस्त झाला आहे. कोरोनाच्या काळात स्वच्छतेवर भर देण्यासाठी महानगरपालिका आवाहन करत आहे. मात्र ठणठणाट असल्यामुळे घरोघरी राबविण्यात येणारी स्वच्छता मोहिम बारगळली आहे. महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. वेळेवर नळपट्टीचा भरणा करून देखील नागरिकांना गेल्या १६ दिवसांपासून पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
या पाणीटंचाईमुळे एकिकडे अस्वच्छता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच दुसरीकडे आव्वाच्या सव्वा दराने पाण्याची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे. परभणी शहराला पाणीपुरवठा होत नसल्यामुळे अनेकांना खाजगी टँकर किंवा मिनी टँकरद्वारे नाईलाजास्ताव पाणी विकत घ्यावे लागत आहे. मनपा पाणीपुरवठा करण्यास हतबल ठरत आहे. विशेष म्हणजे परभणी शहरातील काही नगरसेवकांच्या वार्डामध्ये २ किंवा ३ वेळेस पाणीपुरवठा केला जातो तर काही प्रभागामध्ये एक थेंबही पाणी सोडल्या जात नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असूनही केवळ नियोजन नसल्याच्या कारणाने पाणीपुरवठा होत नाही. प्रत्येकवेळी जलवाहिनी फुटल्याचे निमित्त केले जाते. या जलवाहीनीचे फोटो सोशल मिडीयावर टाकले जात आहेत. प्रत्यक्षात मात्र मनपा कर्मचारी हे शनिवार, रविवार सुटी घेत संथगतीने काम करत आहेत. त्यामुळे वारंवार पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गांभिर्याने लक्ष देऊन शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरत असली तरी प्रत्यक्षात मात्र मनपा प्रशासन पाणीपुरवठा करण्यास हतबल ठरत असल्याचे दिसत आहे. केवळ घरपट्टी, नळपट्टी वसुली करण्यातच मनपा प्रशासन धन्यता मानत असली तरी नागरिक मात्र या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. मनपाने त्वरीत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची गरज आहे.
गेल्या १६ दिवसांपासून निर्जळीचा सामना परभणीकरांना करावा लागत आहे. पाणीप्रश्नी लोकप्रतिनिधी मात्र मुग गिळून गप्प असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नवीन नळ जोडणीच्या नावाखाली तब्बल १६ दिवसांपासून परभणी शहराला पाणीपुरवठा केला गेला नाही.