बोगस आदेश तयार करणाऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरू

सोशल मीडियातून घेतली जात आहे माहिती

बोगस आदेश तयार करणाऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरू

हिंगोली : जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या नावाने जमावबंदी कलम व आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यासंदर्भातचा बनावट आदेश तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या व्यक्तीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व सायबर पोलीस ब्रांचच्या वतीने तपास सुरू झाला आहे. या संदर्भात पोलिसांकडून सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या मॅसेजची माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे.

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जिल्ह्यात जमावबंदी कलम लागू करण्याबरोबरच आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केल्याचा बनावट आदेश बुधवारी संपूर्ण जिल्हाभर व्हायरल झाला. या आदेशामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. अखेर सायंकाळी सदर आदेश हा बनावट असल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी जयवंशी यांच्याकडून देण्यात आले. शिवाय अशा प्रकारचा आदेश प्रसारित करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस विभागाला सूचना दिल्या होत्या. जिल्हाधिकारी हे जिल्ह्यातील प्रशासकीय पातळीवरचे सर्वोच्च पद आहे. शिवाय जिल्हा दंडाधिकारी म्हणून देखील जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेले अधिकार महत्त्वाचे आहेत. अशा पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांच्या नावाने बनावट आदेश तयार करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरत आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक खंडेराय यांच्यासह सायबर क्राईम ब्रांचचे कर्मचारी सदर व्यक्तीच्या शोधा करिता कामाला लागले आहेत.

अनेक शाळांना सुट्टी

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनविण्यात आलेला बनावट आदेश सोशल मिडीयाद्वारे व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक खासगी शाळांनी हा आदेश खरा समजून शाळांना सुट्टी जाहीर केली होती. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच सदर शाळांनी शाळेमध्ये प्रत्यक्ष शिक्षणाचे काम सुरू केले होते. त्यातच प्राप्त झालेल्या आदेशामुळे घाबरलेल्या संस्था अध्यक्षांनी चौकशी न करता शाळांना सुट्ट्या दिल्याचा प्रकार समोर आला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.