विजय कुलकर्णी / परभणीः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात संकरीत गोपैदास प्रकल्प अंतर्गत (बलसा डेरी) येथे देवणी व होलदेव संकरीत जनावरांचा जाहीर लिलाव बुधवार,२० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यात शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तीस लिलावापूर्वी ४ हजार रुपये अनामत रक्कम भरून लिलावात भाग घेता येईल. अनामात रक्कम ही संपूर्ण लिलाव प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतरच परत मिळणार आहे. लिलावात उच्चतम बोलीवर लिलाव सोडण्यात येणार आहे. लिलाव सुटलेल्या व्यक्तीस बोलीप्रमाणे संपूर्ण रक्कम तात्काळ भरावी लागणार असून तसे न केल्यास अनामत रक्कम जप्त होणार आहे. पूर्ण रक्कम भरूनच जनावर ताब्यात देण्यात येईल.
अपेक्षेप्रमाणे किंमत न आल्यास लिलाव रद्द करण्याचा अधिकार लिलाव समितीकडे राहणार आहे. तसेच लिलावासंदर्भातील इतर अधिकार लिलाव समितीने राखून ठेवले आहेत. लिलावप्रसंगी कोव्हिड-१९ च्या धरतीवर सोशल डिस्टंसिंग व मास्कचा वापर अनिवार्य आहे, अशा अटी नमुद करण्यात आल्या आहेत. बलसा डेअरीस येण्यासाठी गंगाखेड नाक्यामार्गे रायपूर-लोहगाव रोडचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.