परभणी : सेलू तालुक्यातील वालूर ग्रामपंचायतीच्या पहिल्याच मासिक बैठकीत गुरुवार दि. १८ रोजी सरपंच व नवनिर्वाचित सदस्यांत प्रभागातील सार्वजनिक नळयोजनेसह अन्य कारणावरून शाब्दिक चकमक झाली. एकमेकांवर धाऊन मारहाणी पर्यंत प्रकरण गेल्याने सेलू पोलिसांत परस्पर विरोधी गुन्हा करण्यात आला आहे.
वालूर ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. तालुक्यात राजकीय दृष्ट्या महत्वाची तसेच सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या १७ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीला गावाच्या विकास कामांसाठी शासनाकडून दरवर्षी विविध स्वरुपात लाखो रुपये निधी प्राप्त होतो. यामुळे ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची झाली. सरपंच संजय साडेगावकर यांचे यावेळी १७ पैकी ११ सदस्य निवडून आल्याने त्यांचे ग्रामपंचायतीवरील वर्चस्व कायम राहीले. तर विरोधी गटाचे १७ पैकी ६ सदस्य निवडून आले.
गुरुवारी ग्रामपंचायतीच्या सभागृहात नवनिर्वाचित सदस्यांचे पहिल्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या पहिल्याच बैठकीत सदस्य लिंबाजी रामराव कुपणवार, रामराव शामराव बोडखे यांच्यात प्रभागातील नळयोजनेवरुन वाद सुरू झाला. एकमेकांवर खुर्च्या फेकून मारहाणी पर्यंत प्रकरण गेले.
दरम्यान लिंबाजी रामराव कुपणवार यांनी दिलेल्या तक्रारींवरून सरपंच संजय नारायणराव साडेगावकर व रामराव शामराव बोडखे यांच्या विरोधात मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर सरपंच संजय नारायणराव साडेगावकर यांनी आपल्याला मारहाण करून गळयातील दोन तोळे सोन्याची चेन हिसकावून घेतली असल्याची तक्रार केली असल्याने लिंबाजी रामराव कुपणवार, सतीश गणपतला कलाल, चंद्रकांत हनुमंतराव चौधरी व धारुजी त्र्यंबक धाबे या चौघांविरोधात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांनी वालूर येथे घटनास्थळी भेट दिली.