औरंगाबाद : औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावं यासाठी मनसेने २६ जानेवारी पर्यंतचा अल्टिमेटम सरकारला दिला होता. मात्र अल्टिमेटम उलटून आठ दिवस झाले तरीही मनसेकडून काही करण्यात आले नव्हते. नामातरांच्या अल्टिमेटमवर मनसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज मनसे कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवली. त्यांच्या अंगावर पत्रके फेकून जोरदार घोषणाबाजी केली. मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच हा राडा केल्यामुळे मनसेचे बळ औरंगाबादेत वाढत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मनसेने शिवसेनेला औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करा असा अल्टिमेटम दिला होता. हा अल्टिमेटम संपला तरी काहीच निर्णय राज्य सरकारने न घेतल्यामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेने आज क्रांती चौकात चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवून त्यांना घेराव घातला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेनेच्या निषेधाची पत्रके खैरेंच्या अंगावर फेकत शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.