माधव पिटले/ निलंगा: केळगाव येथे एकाच्या घरी अवैधरीत्या देशी व विदेशी दारू विक्री करत असताना निलंगा पोलिसांनी धाड टाकून देशी व विदेशी दारूच्या बाटल्या पकडून गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , निलंगा तालुक्यातील केळगाव येथे माधव व्यंकटराव कळसे हा इसम गावातील एका अड्डयावर अवैधरीत्या देशी व विदेशी दारू विक्री करत होता. दि. १४ रोजी सांयकाळी ८ वाजता निलंगा पोलिसांनी अचानक धाड टाकून देशी दारूच्या वसंत संत्रा कंपनीच्या १८० एम.एल.च्या काचेच्या २६३ बाटल्या किंमत १३ हजार ७६ रूपये व संत्रा असलीधार कंपनीच्या ११९ बाटल्या किंमत ६ हजार ८८ रु यासह विदेशी दारू इम्पेरिअर ब्लू या कंपनीच्या १४ बाटल्या किंमत १४० रू किंमत १९६० रू असे एकूण २१ हजार आठशे २४ रूपयांची अवैध दारू पकडून सदरील व्यक्तीवर निलंगा पोलिस ठाण्यात दि. १५ रोजी पोलिस उपनिरिक्षक गजानन क्षिरसागर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेकायदेशीर व अवैधरित्या देशी व विदेशी दारू विक्री करणारा माधव कळसे हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला आहे.याबाबत निलंगा पोलिस तपास करत आहेत.पुढील तपास बिट जमादार सुर्यवंशी करत आहेत. सदरील अवैध देशी दारू ही ग्रामपंचायत निवडणूकीत मतदारांना वाटप करण्यासाठी आणली होती परंतु याची कुणकुण पोलिसांना लागताच धाड टाकून ही कारवाई केली आहे.